ग्रामस्थांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मूलभूत सुविधा नसल्याने समस्या
बेळगाव : खानापूर तालुक्यातील आमगाव हे गाव वन्यप्रदेशात आहे. यामुळे येथे सरकारच्या कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आवश्यक वैद्यकीय सुविधाही नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी संपूर्ण आमगावचे स्थलांतर करून ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. खानापूर तालुका हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. तसेच भीमगड अभयारण्यही येथे असून, लहान-मोठी गावे वसलेली आहेत. आमटे ग्रा. पं. व्याप्तीतील आमगावही या प्रदेशात वसलेले आहे. वन विभागाच्या काही नियमांमुळे दैनंदिन जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
गावाला रस्ते व पूल अशा मूलभूत सुविधाही नाहीत. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटून वाहतूक पूर्णपणे बंद होते. याकाळात जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्याचीही जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत कारावी लागते. तसेच गावाचा संपर्क तुटल्याने वैद्यकीय सेवा मिळणेही कठीण होते. अंगणवाडी व शाळा जवळ नसल्याने मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गावातील 99, 101, 102, 103 सर्व्हे क्रमांकावरील गावठाण जागेत नवे गाव निर्माण करून गावात असणाऱ्या 230 ते 250 कुटुंबीयांचे त्या जागेत स्थलांतर करावे. तसेच सदर ठिकाणी मूलभूत सुविधाही देण्यात याव्यात. तसेच सरकारकडून वसती सुविधाही देण्यात यावी. आधारकार्ड, रेशनकार्ड, शिक्षण सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.









