डॉ. साळकर : कोविड वॉरियर्स पॅलेंडरचे प्रकाशन
प्रतिनिधी /पणजी
कोविड संकटाने जगाला होत्याचे नव्हते केले. कोविड संकटामुळे माणुसकीचे खरे दर्शन घडले. या संकट काळात अनेकांनी जीवाची बाजी लावून सेवाभावीवृत्तीने झोकून दिले. पैसा, श्रीमती ही श्रेष्ठ नसून, जीवनातील प्रत्येक क्षण हा आपुलकीने व आदराने कसा जगावा हे कोविड संकटामुळे कळाले. गोव्यातही कोविड संकट काळात विविध संस्था, क्लब, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, परिचारिका, पोलिस व इतर सामान्य नागरिकांनीही धैर्य दाखवले. सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मंगेश गावकर यांनीही कोविड काळाड केलेले कार्य अतुलनीय असेच आहेत. त्यांनी ‘कोविड वॉरियर्स पॅलेंडर’ची निर्मिती करून आम्हाला काम करण्यास आणखी स्फूर्ती दिली आहे, असा शब्दांत डॉ. शेखर साळकर यांनी मंगेश गावकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
सामाजिक कार्यकर्ते मंगेश गावकर यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या ‘कोविड वॉरियर्स पॅलेंडर’च्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पणजी पोलीस निरीक्षक निखिल पालयेकर, उद्योजक राजकुमार कामत, मंगेश गावकर, विधाती मंगेश गावकर व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. साळकर यांनी कोविड काळात प्रत्येकावर आलेल्या संकटाची माहिती देत कोविड रुग्ण हाताळताना जबाबदारी, सेवा आणि धैर्य यांची सांगड घातल्याचे सांगितले. गरजूंना भाजीपाला, कडधान्य, औषध पुरवठा करणाऱया अनेक संस्थांनी क्लबांनी व नागरिकांनी मदत केल्यानेच त्या काळात सामान्यांना जगता आले. कोविडने जगाला दिलेला माणुसकीचा संदेश हा फार मोठा आहे. ही माणुसकी आणि सेवाभावी लोकांचे हात ज्या प्रकारे कोविड संकट परतवून लावण्यास पुढे आले, त्याची माहिती ‘कोविड वॉरियर्स पॅलेंडर’मधून निश्चितच सर्वांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी मंगेश गावकर यांनी घेतलेले कष्ट त्यातून दिसतात, असेही ते म्हणाले.
राजकुमार कामत म्हणाले, कोविड संकट हे जरी महाभंयकर होते तरी येथील लोकांनी दाखवलेला संयम, धैर्य हे त्याहून मोठे होते. डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सामाजिक संस्था, विविध क्लब यांनी या संकट काळात केलेली मदत व कार्य हे विशेष असल्याने हे सर्वजण खऱया अर्थाने कोविड वॉरियर्स ठरतात. धान्य, औषध व इतर जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्यात अनेकांनी पुढाकार घेतला. कोविड़ वा]िरयर्स बांधवांची पॅलेंडर रुपात माहिती देणारे मंगेश गावकर हेही कोविड खऱया अर्थाने वॉरियर्स ठरतात. कारण त्यांनीही या संकट काळात अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी ‘कोविड वॉरियर्स पॅलेंडर’ काढून राबविलेला हा अभिनव उपक्रम कोविड काळातील मदतनीसांसाठी यापुढेही मार्गदर्शन ठरणार आहे.
या कार्यक्रमात डॉ. साळकर, गौरीश धोंड, पोलीस निरीक्षक पालयेकर, राजकुमार कामत यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याशिवाय पॅलेंडरसाठी केलेली आकर्षक कलाकृती, मांडणी, सजावट यासाठीही कलाकाराचा गौरव करण्यात आला. विधाती गावकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. श्री लक्ष्मी यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश गावकर यांनी आभार मानले.
डॉ. साळकर झाले भावूक
कोविड संकटात रुग्णांची सेवा करताना आलेल्या विविध अनुभवांची माहिती दिली. अनेकांना आपल्या जवळच्या माणसांना भेटता न येताच जगाचा निरोप घ्यावा लागला. आपली मुलगी गोव्यात येताना सीमारेषेवर अडकून पडल्यानंतर भेटता न आल्याचा अनुभव सांगताना डॉ. साळकर यांना गहिवरून आले. असे कितीतरी आई-वडिल असतील ज्यांना आपल्या मुलांना, नातेवाईकांना भेटता आले नसेल. त्यांच्या मनावर झालेला आघात हा आपण जवळून पाहिला असल्याचे ते म्हणाले.









