बेळगाव
अंबाबाई देवस्थान, नाथ पै सर्कल
सोमवंशीय सहस्रार्जुन समाजाच्या अंबाबाई देवस्थानमध्ये पंच कमिटी व विश्वस्त यांच्या पुढाकाराने रविवारी 1 लाख 8 हजार राम नाम जप करण्यात आले. त्यानंतर होम आणि यज्ञ होऊन 12 हजार आहुती देण्यात आल्या. यजमानपद महेश मिरजकर व हरीश धोंगडी यांनी स्वीकारले होते. आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली.
मध्यवर्ती मार्केट, झेंडा चौक
मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटना, झेंडा चौक, मार्केट, बेळगावच्या व्यापाऱ्यांच्यावतीने अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त श्रीराम प्रतिमा पूजन सोहळा पार पडला. त्यांनी पारंपरिक पूजाविधी केल्यानंतर आरती झाली आणि सर्व भाविकांना, प्रसाद लाडूचे वाटप केले. यावेळी परिसरातील व्यापारी, भाजी विव्रेते उपस्थित होते. प्रचंड आतषबाजीचे प्रदर्शन करण्यात आले. बाजारपेठेचा संपूर्ण परिसर भगवे ध्वज आणि भगव्या पताकांनी सुशोभित करण्यात आला होता.
स्वातंत्र्यसैनिक भवन
पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त स्वातंत्र्य सैनिक भवन येथे धार्मिक कार्यक्रम झाले. संघाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीराम प्रतिमेचे पूजन संघाचे उपाध्यक्ष सुभाष होनगेकर, सचिव विवेकानंद राम पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. सुभाष होनगेकर यांनी सर्वांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
कपिलेश्वर मंदिर
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये राममंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवपिंडीला चंदनाचा लेप लावून सुंदर आरास करण्यात आली होती. सोमवारी सकाळी कपिलेश्वराला रुद्राभिषेक करण्यात आला. अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. सनई-चौघड्यांच्या मंगल वाद्यामध्ये हा सोहळा पार पडला. सायंकाळी नगर प्रदक्षिणा घालून सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
मारुती गल्ली, अनगोळ
अनगोळ येथील मारुती गल्ली येथे श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मारुती मंदिरात सकाळी विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाआरती करण्यात आली. महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सायंकाळी 7.30 नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तीन ते साडेतीन हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी महिला मंडळ व युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोतीलाल चौक, भेंडीबाजार
मोतीलाल चौक, भेंडीबाजार येथील सिfिद्धविनायक ट्रस्टच्यावतीने सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 20 हजारहून अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, भोई गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली, आझाद गल्ली, कसाई गल्ली, माळी गल्ली, मेणसी गल्ली, भातकांडे गल्ली यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. परिसरातील व्यापारी व युवक कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन महाप्रसादाचे वितरण केले.









