विजय सरदेसाई यांचे उद्गार : निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न
मडगाव : निवडणुका येतील आणि जातील, सरकारे येतील आणि जातील, पण धार्मिक सलोखा राखला पाहिजे. गोमंतकीय या नात्याने हे आपले कर्तव्य आहे. निवडणुकीत काय निकाल लागणार त्यापेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. मतदारांच्या एका गटाचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून धार्मिक सलोखा जाणूनबुजून बिघडवला जात आहे. हे पाहणे दु:खदायक आहे. एक हिंदू या नात्याने, गोमंतकीयांना हिंदू कसे असावेत किंवा हिंदू धर्माचे पालन कसे करावे हे सांगण्यासाठी गोव्याबाहेरील लोकांची गरज नाही, असे मला ठामपणे सांगायचे आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. शतकानुशतके आम्ही आमच्या धर्माचे आणि मंदिरांचे रक्षण केले आहे. आम्हाला शिकवण्यासाठी बाहेरच्या लोकांची गरज नाही, असे ते म्हणाले.
धार्मिक सहिष्णुता आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाला मूर्त रूप देणारी भारताची कल्पना गोव्याने स्वीकारली आहे. उर्वरित भारतापेक्षा अधिक उत्कटतेने आणि प्रामाणिकपणे गोव्याने ही भूमिका निभावली आहे. आपण अनेकदा देशाच्या इतर भागांमध्ये दंगली होताना पाहतो. गोव्यात अशा प्रकारचे जातीय तणाव आणि शत्रुत्व अस्तित्वात नाही. पण जातीय तेढ निर्माण करण्याचे स्पष्ट प्रयत्न होत आहेत. कारण काही फसव्या विचारसरणीद्वारे फूट पाडणाऱ्यांना वाटते की, अन्यथा त्यांना मते मिळणार नाहीत. ते केवळ मते मिळवण्यासाठी जातीय विषाणू पसरवतात, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.
गोव्यात लोकसभा निवडणुकीपेक्षा जातीय सलोखा राखणे अधिक महत्त्वाचे आहे. सर्व धर्मांमध्ये एकता महत्त्वाची आहे. शांतताप्रिय, उजव्या विचारसरणीच्या आणि धर्मनिरपेक्ष असलेल्या गोव्यातील हिंदूंनी बोलण्याची गरज आहे. अम्ही जाणकार, सामाजिक-राजकीयदृष्ट्या जागरूक आणि विवेकी आहोत असा स्पष्ट संदेश आपण पाठवला पाहिजे. आमचे शत्रू कोण हे सांगण्याची आम्हाला गरज नाही. लईराई देवी असो किंवा मिलाग्रीस सायबीण असो, त्या आपल्या देवी आहेत आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. माझ्यासाठी आपल्या संस्कृतीबद्दल जागरूकता वाढवणे आणि धार्मिक सौहार्दाला प्रोत्साहन देणे हे कोणत्याही निवडणुकीपेक्षा महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी मी मनापासून योगदान देईन, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.