अगरवाल परिवारतर्फे नव्याने शेष-लिंग मंदिराची उभारणी
बेळगाव : कचेरी गल्लीतील अगरवाल परिवारतर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर विशेष धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू सैनिकनगर, गणेशपूर येथे रुद्रकेसरी मठाचे प. पू. हरिगुरु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. आषाढीच्या शुभमुहूर्तावर श्री वासूकी मूर्तीची प्रतिष्ठापना व कळसारोहण दि. 4 जुलै रोजी पार पडले. रविवारी सकाळी 7 वा. सत्यनारायण पूजा झाली. त्यानंतर दुपारी 12 वा. महाआरती झाली. यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते मंदिराचे, माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे, नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्या हस्ते सिद्धारुढ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. धनंजय जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी हरिगुरु महाराज म्हणाले, 100 वर्षांपूर्वी येथे मठ होता. मात्र, मठाधीश कालवश झाल्यानंतर मठाला कोणी उत्तराधिकारी नव्हते. कालांतराने ही जागा अगरवाल परिवाराने घेतली व तेथे कारखाना सुरू करताना बेलपत्राचे झाड बाजूला केले. या परिवाराला कारखान्यात यश आले नाही, तेव्हा बेलपत्र हटविण्यात आल्याचा परिणाम असल्याचे त्यांना सांगण्यात आले. म्हणून त्यांनी पुन्हा या ठिकाणी महंत शेष व लिंग स्थापन करून मंदिर उभारले आणि दर आषाढीला मोठी पूजा येथे करण्यात येते. यंदा या परिवाराने नव्याने मंदिर बांधले असून भक्तांची सोय केल्याचे त्यांनी सांगितले. आज समाजाला अध्यात्माची गरज आहे. भरकटलेल्या तरुणाईला अध्यात्माच्या मार्गाने दिशा दाखवावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गणेशपूर येथील रुद्र केसरी मठामध्ये सिद्धारुढ स्वामींची नित्य पूजा होते. तसेच समाजासाठी उपयुक्त कार्यक्रम हाती घेतले जातात.









