ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप जेव्हा विकासाच्या मुद्यावर मागे पडलं तेव्हा त्यांनी कर्नाटक निवडणुकीत धार्मिक विषय आणले. धार्मिक गोष्टी या वैयक्तिक आस्थेचा विषय आहे. हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. धार्मिक प्रचाराला एकदा-दोनदा बळी पडतात, सातत्याने तोच प्रकार झाला तर त्याला जनता नाकारते, हे कर्नाटकच्या निकालावरुन स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने धार्मिक प्रचाराला महत्व दिले, तर काँग्रसेने बेरोजगारी, महिलांचे प्रश्न यासारख्या विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. धार्मिक गोष्टी राजकारणाचा विषय होऊ शकत नाहीत हे कर्नाटकाच्या लोकांनी दाखवून दिलं. काँग्रेसच्या ज्या लोककल्याणकारी योजना जाहिरनाम्यात देण्यात आल्या होत्या. त्या योजनांना लोकांनी प्रतिसाद दिला. रोजगार, सुरक्षा, महागाई, शांतता असे अनेक लोकांसमोर प्रश्न होते. भाजप यावर काही बोलू शकले नाही. डबल इंजिन सपशेल रुळावरून घसरलंय हे स्पष्ट झालं आहे.
सुडाचे राजकारण, राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय, त्यांना बेघर करणे या गोष्टी लोकांना आवडल्या नाहीत. त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून आला, असेही चव्हाण म्हणाले.








