वेगाने तपासचक्र, 24 लोक चौकशीसाठी ताब्यात, व्यापक कारस्थानाचा संशय, सावधानतेचा इशारा
वृत्तसंस्था / बरेली (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील बरेली या शहरात शुक्रवारच्या नमाजानंतर उसळलेल्या दंगलीचा तपास वेगाने होत असून दंगल भडकविल्याचा आणि तिचे सूत्रसंचालन केल्याचा आरोप असणारा मौलवी तौकीर रझा खान याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासमवेत अन्य 24 संशयितांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
‘आय लव्ह मोहम्मद’ प्रकरणावरुन ही दंगल उसळली होती. या प्रकरणात मुस्लीम समाजाने शुक्रवारच्या नमाजानंतर इस्लामिया मैदानात जमून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करावे, असे प्रक्षोभक आवाहन रझा याने केले होते. नमाज आटोपून मोठा जमाव मैदानाकडे जात असताना त्याच्याकडून प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्या होत्या. या सर्व घटनांमुळे दंगल भडकली, असा आरोप आहे.
प्रकरण काय आहे…
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’ असे लिहिलेली भित्तीपत्रके अकस्मात झळकू लागली होती. या भित्तीपत्रकांनी काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर या भित्तीपत्रकांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी मोठे मोर्चे निघण्यास प्रारंभ झाला. तसेच हे लोण अन्य राज्यांच्या शहरांपर्यंतही झपाट्याने पसरले. त्यामुळे भारतातील अनेक महानगरे आणि शहरांमध्ये आय लव्ह मोहम्मद अशी पोस्टर्स झळकू लागली आहेत. त्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होत आहे. पोलिसांनी भित्तीपत्रकांवर आणि तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली.
दंगलीचे आणखी एक कारण
शुक्रवारी मोठ्या जमावासमोर भाषण करताना रझा याने प्रक्षोभक भाषेचा उपयोग केला, असा आरोप आहे. भाषणानंतर परिस्थिती हाताबाहेर जाणार, याची कल्पना आल्याने त्याने निदर्शने आणि मोर्चा पुढे ढकलल्याची घोषणा केली होती. तथापि, या घोषणेमुळे मोठ्या संख्येने उपस्थित झालेला जमाव अधिकच संतापला. यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिकांनी रझा आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात सात तक्रारी सादर केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारावर शनिवारी रझा याच्यासह आणखी 24 जणांना अटक झाली.
पोलिसांची केली दिशाभूल
शुक्रवारच्या नमाजानंतर कोणीही इस्लामिया मैदानाकडे जाणार नाही, असे आश्वासन रझा याच्याकडून देण्यात आले होते. तथापि, ते आश्वासन पाळण्यात आले नाही. निदर्शने पुढे ढकलण्यात आली आहेत, अशी तोंडदेखली घोषणा रझा याने केली, असे आतापर्यंतच्या तपासात उघड झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. मोठा जमाव मैदानाकडे जात असल्याने पोलिसांनी त्वरित बंदोबस्त वाढवला. नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना लाठीचार्ज करावा लागला.
तौकीर रझा खान हा कोण ?
सुन्नी इस्लामची बरेलवी नामक शाखा आहे. या शाखेचे स्थापक अहमद रझा खान हे होते. सध्याचा मौलवी तौकीर रझा खान हा अहमद रझा खान यांचा वंशज आहे. गेली 20 वर्षे तो राजकीयदृष्ट्या सक्रीय आहे. प्रक्षोभक भाषणासाठी तो प्रसिद्ध आहे. बरेली शहराच्या मध्यवस्तीत ही मशीद असून मशीदीपासून जवळ इस्लामिया मैदान आहे. याच भागात ही दंगल शुक्रवारी उसळली होती.
‘आय लव्ह मोहम्मद’ मोहीम
याचा प्रारंभ 9 सप्टेंबरला कानपूर शहरात झाला होता. त्या दिवशी ‘बरावाफत’ मिरवणुकीनंतर मार्गांवर ‘आय लव्ह मोहम्मद’ असा मजकूर असलेले पोस्टर्स झळकले. या पोस्टर्सना स्थानिक हिंदूंनी आक्षेप घेतला. बरावाफत मिळवणुकीत असे पोस्टर्स झळकविण्याची परंपरा नाही. हे पोस्टर्स हेतुपुरस्सर भावना भडकाविण्यासाठी लावण्यात आले आहेत, असा आक्षेपकर्त्यांचा आरोप होता. हे पोस्टर्स अनुमती न घेता चिकटविण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी काही तरुणांना अटक केली होती. या घटनेनंतर हे प्रकरण उत्तर प्रदेशाच्या अनेक शहरांमध्ये पसरले. नंतर देशातील अनेक शहरांमध्येही असे पोस्टर्स दिसू लागल्याने तणाव निर्माण झाला आहे.
तणाव निवळण्यासाठी प्रयत्न…
ड सामाजिक सलोखा टिकून रहावा, यासाठी बरेलीत काही संस्थांचे प्रयत्न
ड आय लव्ह मोहम्मद या मोहीमेतून दंगल निर्माण झाल्याचा आहे आरोप
ड पोलीसांकडून अनेकांची धरपकड, कारस्थानाच्या संदर्भात तपास होणार
ड प्रशासनाकडून शांततेचे आवाहन, दंगलखोरांवर कठोर कारवाईचा इशारा









