मामुटीसाठी मोहनलालने देवपूजा केल्याने आक्षेप
वृत्तसंस्था / साबरीमला
केरळचा प्रसिद्ध अभिनेता मामुटी ऊर्फ मोहम्मद कुट्टी यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा या सदिच्छेने मोहनलाल नामक विख्यात अभिनेत्याने साबरीमला मंदिरात केलेल्या पूजेला धर्मांध मुस्लीमांनी आक्षेप घेतला आहे. केवळ अल्लालाच आपण भजायचे असते. अन्य कोणत्या देवाला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
सध्या मामुटी ऊर्फ मोहम्मद कुट्टी हा अभिनेता सध्या आजारी आहे. त्याला लवकर बरे वाटावे, म्हणून मोहनलाल याने साबरीमला येथे ‘उषा पूजे’चे आयोजन केले होते. साबरीमला देवस्थानने दिलेल्या पावतीत मोहम्मद कुट्टी याचे नाव आणि त्याचे नक्षत्र दिलेले आहे. यावरुनही पूजा मोहनलाल यांनी कुट्टी याच्यासाठीच केल्याचे स्पष्ट होत आहे. उषा पूजा हा साबरीमला मंदिरातील महत्वाचा पूजा विधी मानला जातो. हे वृत्त प्रसिद्ध होताच धर्मांध मुस्लीमांनी या पूजेला विरोध केला.
18 मार्चची घटना
18 मार्चला मोहनलाल यांनी भगवान अय्यप्पा स्वामींच्या साबरीमला मंदिराला भेट दिली होती. त्यांनी देवस्थानच्या साहाय्याने उषा पूजेचे आयोजन केले होते. ही पूजा यथासांग करण्यात आली होती. त्यानंतर, काही दिवसांनी या पूजेची पावती उघड झाली. या पावतीत मोहम्मद कुट्टी याचे नाव आणि त्याचे नक्षत्र यांची नोंद होती. यावरुन ही पूजा कुट्टी याच्यासाठीच करण्यात आली होती, ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे काही धर्मांधाची माथी भडकली आहेत. ही पूजा जर मोहम्मद कुट्टी याला सांगून करण्यात आली असेल तर तसे करणे चुकीचे आहे, असे या धर्मांधांचे म्हणणे आहे. भक्ती केवळ अल्लाचीच करावी लागते. अन्य देवतेची करायची नसते, असा त्यांचा आग्रह आहे. मोहनलाल आणि कुट्टी एकमेकांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी ही पूजा केली असावी, अशी माहिती देण्यात आली.
qqqqqqq
पूजा करण्याच्या कृतीचे मोहनलाल यांनी समर्थन केले आहे. एखाद्या मित्राच्या प्रकृतीला बरे वाटावे म्हणून पूजा करण्यात काय चुकीचे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच ही पावती देवस्थानच्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीतरी उघड केली असावी, असेही प्रतिपादन मोहनलाल याने केले. मात्र पावती देवस्थानाकडून उघड झाल्याचा देवस्थान समितीने इन्कार केला आहे. पावतीचा एक भाग पूजा करणाऱ्याला दिला जातो. तो उघड झाला असावा, असे अनुमान व्यवस्थापन समितीने व्यक्त केले. एकंदर, यामुळे नवा वाद निर्माण झाला असून धर्मांधांवर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.









