भारतातील हिंदू संघटनांकडून निषेध, जागतिक जनमत बनविण्याची केंद्र सरकारला सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बांगला देशात हिंदूंवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच असून शनिवारी तीन मंदिरांवर हल्ला करण्यात आला आहे. यात ढाक्यातील इस्कॉन मंदिराचाही समावेश आहे. अशी स्थिती असताना बांगला देशच्या प्रशासनाने इस्कॉला संरक्षण न देता उलट या संस्थेवरील कारवाई वाढविली आहे. या संस्थेशी संबंधीत 17 व्यक्तींची बँक खाती 30 दिवसांसाठी गोठविण्यात आली आहेत. तर अनेकजणांना अटक करण्यात आली आहे. भारतातील हिंदू संघटनांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
शुक्रवारी रात्री धर्मांध गुंडांच्या एका झुंडीने ढाक्यातल्या इस्कॉन मंदिरावर मोठा हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात या मंदिराच्या वास्तूची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काही मंदिरे लुटण्यात आली असून काही हिंदूंना मारहाण झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. बांगला देश प्रशासनाने मात्र आपल्या देशात हिंदू सुरक्षित आहेत, अशी सारवासारवी करत कानावर हात ठेवले आहेत.
हिंदू संघटनांकडून निषेध
बांगला देशात होत असलेले हिंदूविरोधी अत्याचार आणि मंदिरांची होत असलेली पाडापाडी यामुळे व्यथित झालेल्या भारतातील हिंदू संघटनांनी बांगला देश प्रशासनाचा निषेध केला. युनुस प्रशासनाने हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावेत, असे आवाहन या संघटनांनी केले. तसेच भारत सरकारने यासंबंधात संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवावा आणि विश्वसमुदायाकडून बांगला देश प्रशासनावर दबाव आणावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.
आर्थिक निर्बंध लादा
बांगला देशावर आर्थिक निर्बंध लादले जावेत, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. भारत सरकारने त्वरित बांगला देश प्रशासनाला तीव्र शब्दांमध्ये समज द्यावी आणि अत्याचार थांबविण्यास भाग पाडावे. भारताने आता स्वस्थ बसू नये. तसे झाल्यास जगात चुकीचा संदेश जाईल. बांगला देश प्रशासनाला जरब बसेल अशी कारवायी भारताकडून अपेक्षित असून तेथील पिडित जनतेच्या सुरक्षेसाठी जे करता येणे शक्य आहे, ते केले पाहिजे, अशी सूचना केली गेली.
संघाचे वक्तव्य
भारतीय जनता पक्षाची मातृसंघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेने शनिवारी बांगला देश प्रशासनाच्या विरोधात एक वक्तव्य प्रसिद्धीस दिले. त्या देशात मुस्लीम दहशतवादी आणि धर्मांध धुमाकूळ घालत असताना या देशाचे प्रशासन डोळेझाक करीत आहे. त्या प्रशासनाला त्याच्यावरच्या उत्तरदायित्वाची जाणीव नाही. ती करुन देण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने बांगला देशला इशारा द्यावा आणि जनमत निर्माण करावे. संयुक्त राष्ट्रसंघाला जागे करावे आणि दडपण आणण्यास सांगवे, अशी मागणी वक्तव्यात करण्यात आली आहे. इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मोय कृष्ण दास यांची त्वरित सुटका करण्यान यावी अशी मागणीही संघाकडून करण्यात आली आहे.
विदेशांमध्येही निषेध
अमेरिका, ब्रिटन आणि इतर युरोपियन देशांमधील हिंदू संघटनांनीही बांगला देशचा निषेध केला आहे. या देशातील अल्पसंख्याकांवरचे अत्याचार थांबले नाहीत, तर त्या देशावर कठोर आर्थिक कारवाई करावी, अशी मागणी अमेरिकेतील हिंदू संघटनांनी जोसेफ बायडेन प्रशासनाकडे केली आहे. लोकशाहीची चाड असलेल्या सर्व देशांनी बांगला देशातील हिंदूंना संरक्षित करावे, असे आवाहन केले गेले.
भारताने हस्तक्षेप करु नये
बांगला देशात हिंदू सुरक्षित आहेत, असा कांगावा त्या देशाच्या प्रशासनाने केला आहे. भारताने आमच्या देशात लक्ष घालू नये. या देशात शांतता असून हिंदूंवर कोणतेही संकट नाही. बांगला देशच्या संदर्भात भारत दुहेरी नीती उपयोगात आणत आहे, असा आरोपही बांगला देशच्या मंत्र्याने व्यक्तव्याद्वारे केला आहे. मात्र, बांगला देशातून येणाऱ्या वृत्तांच्या अनुसार तेथील प्रशासन हिंदूंवरील अत्याचारांकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
अत्याचारांना खीळ नाही
ड बांगला देशात हिंदूचे जीवन असुरक्षित, जगभरातून हिंसाचाराचा निषेध
ड बांगला देशावर आर्थिक निर्बंध लादण्याची अनेक संघटनांकडून मागणी
ड भारताने संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवावा : रा. स्व. संघाची मागणी
ड बांगला देशात इस्कॉनसंबंधित अनेक कार्यकर्त्यांची बँक खाती गोठविली









