आघाडीतील सर्वच पक्षांचे वेगवेगळे सूर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, चेन्नई
विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ मागील काही काळापासून आकारास येत आहे, या आघाडीत सामील सर्व पक्षांमध्ये भाजपविरोधात एकवाक्यता दिसून येत होती. परंतु द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्मावरून केलेल्या वक्तव्यानंतर इंडिया आघाडीच धर्मसंकटात सापडल्याचे चित्र आहे. उदयनिधी आणि इंडिया या आघाडीला आता भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून लक्ष्य केले जात आहे. तर उदयनिधी यांचा उघड बचाव करणे इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी टाळले आहे.
काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (युबीटी) या पक्षांनी उदयनिधींना थेट लक्ष्य करणे टाळले असले तरीही त्यांच्या वक्तव्याबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. तर या मुद्द्यावर संजदने मौन बाळगले असून नितीश कुमार यांची यामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. उदयनिधी यांच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एम. के. स्टॅलिन यांनी स्वत:च्या पुत्राच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे.
तर दुसरीकडे उदयनिधी हे स्वत:च्या वक्तव्यावर ठाम आहेत. द्रमुक हा इंडिया या नव्या आघाडीतील मजबूत भागीदार आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पसंतीचा पक्ष देखील आहे. भारत जोडो यात्रेत द्रमुकनेही मोठा सहभाग घेतला होता. सनातन धर्म हा मलेशिया आणि डेंग्यूप्रमाणे असल्याने तो संपविला जावा असे उदयनिधी यांनी म्हटले होते.
उदयनिधी यांच्या या वक्तव्यामुळे इंडियातील घटक पक्षांची गोची झाली आहे. उदयनिधींच्या विरोधात भूमिका मांडणे काँग्रेस टाळत आहे, तसेच त्यांचे समर्थन करणे देखील काँग्रेसला राजकीयदृष्ट्या शक्य नाही. उत्तर भारतातील काँग्रेस नेत्यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सर्व धर्मांचा आदर करण्यावर जोर दिला आहे. सर्व धर्मांचा सन्मान केला जावा. प्रत्येक राजकीय संघटनेला स्वत:चे विचार व्यक्त करणे स्वातंत्र्य आहे, काँग्रेस पक्ष सर्व धर्म अन् श्रद्धांचा आदर करतो असे वेणुगोपाल म्हणाले. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते डॉ. करण सिंह यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत ते दुर्दैवी ठरविले आहे.
तृणमूलकडून निंदा
तृणमूल काँग्रेसने उदयनिधी यांच्या वक्तव्याची निंदा केली आहे. भारतासारख्या देशात अशाप्रकारच्या वक्तव्यांना कुठलेच स्थान नाही. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्याची निंदा केली जावी. भारतात सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. इंडिया गटाचे अशाप्रकारच्या वक्तव्याशी कुठलेच देणेघेणे नाही असे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांची भूमिका
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मी आदर करते. प्रत्येक धर्माच्या भावना वेगवेगळ्या असतात. भारतात विविधतेत एकता हेच मूळ तत्व आहे. एका वर्गाला ठेच पोहोचेल अशा कुठल्याही कृत्यात आम्ही सामील होऊ नये. मी सनातन धर्माचा सन्मान करते. आम्ही पूजा करणाऱ्या पुरोहितांना पेन्शन देतो. बंगालमध्ये दुर्गा पूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आम्ही मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये जातो. आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करावा असे माझे मानणे असल्याचे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढले आहेत.









