अध्याय पहिला
बाप्पा राजाला म्हणाले, अरे सगळ्dयांच्यात माझं बीज आहे. ते पहायचा प्रयत्न कर. म्हणजे तुला सर्व सारखे वाटतील. समजा तू ओंजळभर गहू घेतलेस तर त्यातला प्रत्येक दाणा निरनिराळ्या आकाराचा दिसेल पण म्हणून काही तू त्या दाण्यात हा चांगला तो वाईट असा फरक करत नाहीस. सरसकट तू त्याला गहू समजतोस तसंच माणसे निरनिराळ्या आकाराची असली, त्यांच्यात स्त्राrपुरुष असा फरक असला तरी ती सगळी माझीच रूपे आहेत. त्यांच्यात माझेच आत्मतत्व भरलेले असल्याने सगळ्यांच्यात माझा वास आहे. एकदा ही गोष्ट मनात बिंबली की, हा आपला तो परका असा भेदभाव तुझ्या मनात कदापि येणार नाही. त्याचप्रमाणे मनातील सुख-दु:ख, क्रोध, हर्ष, भीती या भावभावनांचे ठिकाणीही समान रहा. आत्मा ही आपली खरी ओळख असून आत्म्याचा शरीराशी काहीही सबंध नसतो म्हणून शरीराला जाणवणाऱ्या सुखदु:खाच्या प्रसंगी तू त्यापासून अलिप्त रहा. सर्वांच्या ठिकाणी मी स्थित आहे हे लक्षात घेऊन जो मला सर्वांच्यात पाहतो त्याला योगी म्हणतात. तो माझ्याशी सदैव जोडला गेलेला असतो. जो सगळ्यांच्यात माझे अस्तित्व पाहू शकतो त्याचा त्याच्या ज्ञानेन्द्राrयांवर ताबा असतो. तो त्यांच्याकडून त्याला हवे ते लोककल्याणकारी कार्य करून घेऊ शकतो. म्हणून साधकाने ज्ञानेंद्रिये बाह्य वस्तूंची भुरळ घालून आपल्याला भ्रमिष्ट करत आहेत हे लक्षात आल्याबरोबर त्यांना आवरून धरावे. वाट्याला येईल त्या परिस्थितीत जो समाधानी राहील त्याचा त्याच्या इंद्रियांवर ताबा राहतो आणि जो ह्याप्रमाणे इंद्रियांवर ताबा मिळवतो त्याची प्रज्ञा स्थिर होते. त्याला सर्वत्र ईश्वराचे म्हणजे माझे अस्तित्व जाणवत असते. असा योग जो साधतो तो योग उत्तम योग म्हणून मला मान्य आहे.
सर्वत्र समबुद्धीने पाहणे म्हणजेच कर्मयोग असं बाप्पांनी सांगितलं. सुरवातीला माणसाचं मन हे सहजी मान्य करायला तयार होत नाही पण जेव्हा आत्मा हेच आपलं मूळ स्वरूप आहे व मिळालेला देह हे तात्पुरतं रूप आहे हे लक्षात येतं तेव्हाच मनुष्य वेगळा विचार करू लागतो. म्हणून मूळ स्वरूप आणि तात्पुरतं रूप या गोष्टी माणसानं सतत लक्षात ठेवायचा अभ्यास करावा. म्हणजे सध्याचं आपलं शरीर हे आपलं तात्पुरतं रूप असल्याने त्याच्यासाठी दुसऱ्या शरीराकडून म्हणजे दुसऱ्या तात्पुरत्या रूपाकडून काय अपेक्षा करणार हा एक विचार आणि समजा त्या पूर्ण झाल्या तरी त्यांचा टिकाऊपणाही तात्पुरताच असणार हे लक्षात घेतलं की, माणसाच्या दृष्टीने त्या अपेक्षांचं महत्त्वच संपतं. परिणामी माणसाच्या व्यक्ती, वस्तू व परिस्थिती यांच्याकडूनच्या अपेक्षा संपुष्टात येतात आणि निरपेक्ष राहून कर्म करण्याचं कौशल्य साधलं जातं. हे कौशल्य साधलं की, माणसाला जी बुद्धी प्राप्त होते त्याबद्दल पुढील श्लोकात बाप्पा सांगत आहेत.
आत्मानात्मविवेकेन या बुद्धिर्दैवयोगत: ।
स्वधर्मासक्तचित्तस्य तद्योगो योग उच्यते ।। 48 ।।
अर्थ-स्वधर्माचे ठिकाणी चित्त आसक्त असलेल्या मनुष्याला दैवयोगाने व आत्मानात्मविवेकाने सुबुद्धि होणे हाच खरा योग होय.
विवरण-इथं बाप्पा स्वधर्म हा शब्द वापरतात. जन्माला आल्यावर प्रत्येकाला कोणता ना कोणता धर्म तो ज्या कुळात जन्माला आला आहे त्यानुसार मिळतो. तो धर्म वेगळा आणि स्वधर्म वेगळा असं इथं बाप्पांना सांगायचं आहे. स्वधर्म म्हणजे आपल्याला ईश्वराने नेमून दिलेलं कर्तव्यकर्म होय. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जीवनात काय कार्य करायचं हे ईश्वराने ठरवून दिलेलं असतं पण मनुष्य स्वत:च्या बुद्धीने ते सोडून इतर काहीतरी करत बसतो. त्यामुळे त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत निश्चितच बाधा येते.








