ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. काही अटींसह न्यायालयाने त्यांच्या अटकेपासून संरक्षणाचा आदेश 8 जूनपर्यंत कायम ठेवला आहे.
कार्डेलिया क्रूझ कारवाई प्रकरणात वानखेडे यांनी आर्यन खानला वाचविण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयने याप्रकरणी वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांनी याविरोधात रिट पिटीशन दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं. तसेच, 22 मे पर्यंत वानखेडे यांना सीबीआयला आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने वानखेडे यांना 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
अटकेपासून संरक्षण देताना न्यायालयाने वानखेडे यांच्यासमोर काही अटीही ठेवल्या आहेत. यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.








