प्रियांका जारकीहोळी : यमकनमर्डी मतदारसंघात प्रचार
बेळगाव : काँग्रेस सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे. संविधानानुसार प्रत्येकाला न्याय मिळाला आहे. यासाठीच गोरगरीब, दीन-दलितांच्या बाजूने असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मत देऊन आपल्याला विजयी करावे, असे आवाहन चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील सलामवाडी, कोट, नागनूर के. एम. आणि मणगुत्ती गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारादरम्यान त्या बोलत होत्या. गोरगरिबांच्या बाजूने राहणारा पक्ष म्हणजे काँग्रेस, या पक्षाला पाठिंबा देऊन अधिक बळकट करावे. गॅरंटी योजनांचा नागरिकांना समपर्कपणे लाभ करून देण्यात येत आहे. प्रत्येकाच्या विकासासाठी या योजना अधिक उपयोगी ठरत आहेत. वचन दिल्याप्रमाणे काँग्रेस सरकारने त्यांची पूर्तता केली आहे. भविष्यामध्ये आदर्श राज्य निर्माण करण्याच्यादृष्टीने विकासाभिमुख योजना राबविल्या जाणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाला मत देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणासह क्रीडा क्षेत्रामध्ये सतीश जारकीहोळी फौंडेशनकडून भरीव कामगिरी करण्यात आली आहे. अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. भविष्यामध्येही अशा प्रकारे ती सुरूच राहणार असून काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी मतदारांची साथ आवश्यक आहे. देशामध्ये पारदर्शक प्रशासकीय व्यवस्था आणण्यासाठी काँग्रेसला विजयी करणे आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाकडूनच महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली आहे. जिल्ह्यासह देशाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाला मत देऊन निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ग्रा. पं. सदस्य, महिला संघटनांच्या कार्यकर्त्या आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









