19 जुलैपर्यंत करता येणार नाही अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांना पुन्हा एकदा दिलासा प्रदान केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2002 च्या गुजरात दंगलींसंबंधी कथित स्वरुपात खोटे पुरावे निर्माण केल्याप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना देण्यात आलेल्या अंतरिम सुरक्षेचा कालावधी वाढविला आहे. तसेच याप्रकरणी आता पुढील सुनावणी 19 जुलै रोजी होणार आहे. तत्पूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने सेटलवाड यांना तत्काळ आत्मसमर्पण करण्याचा निर्देश दिला होता. या निर्देशालाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
न्यायाधीश बी.आर. गवई, ए.एस. बोपन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सेटलवाड यांच्याकडून दाखल याचिकेवर गुजरात सरकारला नोटीस जारी केली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांना 1 जुलै रोजी अटकेपासून दिलासा दिला होता.
गुजरात दंगलींनंतर बनावट प्रतिज्ञापत्र आणि खोटे साक्षीदार उभे करून निर्दोष लोकांना शिक्षा मिळवून देण्याचा कट रचल्याप्रकरणी सेटलवाड यांना आरोपमुक्त करण्याच्या याचिकेला गुजरात सरकारने विरोध दर्शविला आहे. सेटलवाड यांनी 2002 च्या दंगलपीडितांच्या विश्वासाचा भंग केला असल्याचे गुजरात सरकारने न्यायालयासमोर म्हटले होते. अहमदाबाद पोलिसांनी जून 2022 मध्ये सेटलवाड यांना अटक केली होती. याप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी आर.बी. कुमार आणि संजीव भट्ट हे सहआरोपी आहेत.









