वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
खशोगी हत्या प्रकरणात अमेरिकेने सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना दिलासा दिला आहे. या खटल्यात त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याचे व्हाईट हाऊसने 18 नोव्हेंबर रोजी सांगितले. या निर्णयानंतर बिडेन सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने कोणत्याही राष्ट्राध्यक्षांकडून कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिका आणि सौदी अरेबियाचे संबंध गेल्या काही काळापासून चांगले चाललेले नाहीत. हे नाते पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रिन्स सलमानला सूट देण्यात आल्याचे मानले जात आहे. वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी यांची 2 ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूल, तुर्की येथील संयुक्त अरब अमिराती वाणिज्य दुतावासात हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर मोहम्मद बिन सलमान यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.









