महागाई दरात समाधानकारक घट, 5 टक्के प्रमाण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सणासुदीच्या काळात महागाईच्या आघाडीवर लोकांना समाधान वाटेल असे वृत्त आले आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दराचे प्रमाण 5.02 टक्के राहिल्याची माहिती केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. ऑगस्टमध्ये हा दर 6.83 टक्के होता. तर जुलैमध्ये तो त्यापूर्वीच्या 15 महिन्यांमधील सर्वाधिक, म्हणजे 7.44 टक्क्यांवर पोहचला होता. पावसाने ओढ दिल्याने प्रमाण वाढले होते. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने घोषित केलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये खाद्य महागाई दर 6.56 टक्क्यांवर आला, जो ऑगस्टमध्ये 9.94 टक्के होता. ग्रामीण भागात खाद्य महागाईचे प्रमाण काहीसे अधिक असून ते 6.65 टक्के इतके आहे. आगामी महिन्यांमध्येही महागाई फारशी वाढणार नाही, असे दिसत आहे.
खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या दरात घट
सप्टेंबरात भाज्यांच्या दरात मोठी घट झाली. त्यामुळे भाजी महागाई दर 3.39 टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो 26.14 टक्के होता. मात्र, डाळींच्या किमती काहीशा वाढल्या आहेत. खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. मसाल्याच्या पदार्थांच्या दरात काहीशी घट झाली आहे. दूध आणि दुधाच्या उत्पादनांचे दरही ऑगस्टच्या तुलनेत कमी झाले आहेत. धान्ये आणि धान्यांपासून निर्माण केलेल्या उत्पादनांचे दरही काही प्रमाणात ऑगस्टच्या तुलनेत कमी झाले आहेत.
रिझर्व्ह बँकेलाही समाधान
सप्टेंबरातील महागाईच्या आकडेवारीने रिझर्व्ह बँकेलाही समाधान वाटले आहे. या महिन्यात हायर ब्रँड उत्पादनांचा महागाई दर बँकेच्या अपेक्षेप्रमाणे सहा टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. बँकेने महागाईचा दर 2 ते 6 टक्के असेल असे अनुमान व्यक्त केले होते. त्याप्रमाणे किरकोळ महागाईचा दर राहिला आहे.









