दूध खरेदी-विक्री दरात वाढ होण्याचे संकेत
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या दुधावरील प्रोत्साहनधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकरिता येणारा आर्थिक भार ग्राहकांच्या खिशावर घालण्याची तयारी सरकारने चालविली आहे. परिणामी दूध दरात वाढ होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी शनिवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
म्हैसूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. दूध उत्पादकांना दिले जाणारे प्रोत्साहनधन वाढविण्याचा विचार आहे, असे सांगून त्यांनी दूध दरात वाढ होण्याचे संकेत दिले. दूध दरवाढ म्हटले तर सर्वांना धक्का बसतो. दरवाढ दोन प्रकारची असते. दूध उत्पादकांना अधिक दर देणे आणि दुसरीकडे खरेदीदारांसाठी दर वाढविणे. दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात दोन्ही दर कमी आहे. दूध उत्पादकांना साहाय्य करणे गरजेचे आहे. आगामी दिवसांत कोणावरही अधिक भार पडणार नाही, अशा तऱ्हेने निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.









