अटकेच्या कारवाईला 21 ऑगस्टपर्यंत स्थगिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांगत्वाचा कोटा प्राप्त केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. यापूर्वी सत्र न्यायालयाने पूजा यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता.
तसेच उच्च न्यायालयाने याप्रकरणी दिल्ली पोलीस आणि युपीएससीला नोटीस जारी करत स्पष्टीकरण मागविले आहे. आता पूजा खेडकरच्या अंतरिम जामिनावर 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. अंतरिम जामिनासाठीच्या खेडकरच्या याचिकेवर न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी केली आहे. तर खेडकरच्या वतीने वरिष्ठ वकील सिद्धार्थ लूथरा आणि युपीएससीच्या वतीने नरेश कौशिक यांनी युक्तिवाद मांडला.
अलिकडेच युपीएससीने 31 जुलै रोजी पूजा यांची उमेदवारी रद्द करत भविष्यात कुठल्याही परीक्षांमध्ये सामील होण्यास पूजा खेडकरवर बंदी घातली आहे. खेडकरने आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी युपीएससी नागरी सेवा परीक्षा-2022 साठी स्वत:च्या अर्जात चुकीची माहिती नमूद केल्याचा आरोप आहे. पूजा विरोधात गंभीर आरोप असल्याने सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे सत्र न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी अंतरिम जामीन देण्यास नकार देताना म्हटले होते.









