अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा रद्द : पंधेर निर्दोष, कोली तुरुंगातच राहण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ प्रयागराज, नवी दिल्ली
नोएडाच्या प्रसिद्ध निठारी प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोली आणि मनिंदर सिंह पंधेर यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा दिलासा दिला आहे. अलाहाबाद न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली असून 12 प्रकरणात कोली आणि दोन खटल्यात मनिंदरसिंग पंधेरची निर्दोष मुक्तता केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पंधेर याला तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे त्याच्या वकील मनीषा भंडारी यांनी सांगितले. मात्र, कोली तुरुंगात राहण्याची शक्यता आहे. त्याला अद्याप एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आहे.
अनेक दिवसांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी उच्च न्यायालयाने सुरेंद्र कोली याची निर्दोष मुक्तता केली. गाझियाबाद सीबीआय न्यायालयाने 10 महिन्यांपूर्वी दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आता न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एसएएच रिझवी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
सीबीआयला मोठा झटका…
या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे आणि साक्षीदार नसल्यामुळे आम्ही दोषींना दिलासा देत आहोत, असे अलाहाबाद न्यायालयाने या प्रकरणात म्हटले आहे. अलाहाबाद न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे सीबीआयसाठी मोठा झटका मानला जात आहे. तथापि, सीबीआयचे अधिकारी निकालाच्या प्रतीची वाट पाहत असून निकालपत्र पाहिल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे दिल्लीतील सीबीआय मुख्यालयातून सांगण्यात आले.
निठारी घटनेत सीबीआयने 16 गुन्हे दाखल केले होते. यापैकी सुरेंद्र कोली याला 14 गुह्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती, तर मनिंदरसिंग पंधेरविरुंद्ध दोन खटल्यांमध्ये सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. 2005-06 या कालावधीत झालेल्या लहान मुलांच्या हत्यांनी नोएडा हादरले होते. डिसेंबर 2006 या महिन्यात नोएडातील एका घराजवळच्या नाल्यातून अनेक सांगाडे आढळून आले होते. या प्रकरणात मनिंदरसिंह आणि सुरेंद्र कोली या दोघांना अटक करण्यात आली. तसेच दोघांविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. त्यानंतर निठारी हत्याकांड हे प्रकरण देशभर प्रचंड गाजले होते. या प्रकरणात मुख्य संशयित सुरेंद्र कोली आणि मनिंदरसिंह पंधेर या दोघांनाही न्यायालयाने दिलासा दिला आहे. एकंदर 12 प्रकरणात सुरेंद्रला तर दोन प्रकरणात मनिंदरला दिलासा दिला आहे. या दोघांची फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे. ट्रायल कोर्टाने या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र आता अलहाबाद न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली आहे.
आरोपी निष्पाप मुलांना घरी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर गळा आवळून खून करायचा. एवढ्यावरही त्याचे समाधान झाले नाही, तर तो त्यांच्या मृतदेहांचे छोटे तुकडे करायचे, त्यातील काही शिजवून खाऊन टाकायचे आणि झोपडीच्या मागे असलेल्या नाल्यात टाकायचे. हा भयानक क्रम दीड वर्षांहून अधिक काळ सुरू होता, असे तपासात आढळून आले होते.









