कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगाल पोलीस भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवू शकतात असा निर्णय कलकत्ता उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्दबातल ठरविला आहे. स्वत:च्या 20 जुलैच्या आदेशात अंतरिम निर्देश जारी करण्यापूर्वी अधिकारी यांना याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची संधी देणे योग्य ठरणार असल्याचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना याप्रकरणी नव्याने सुनावणी करण्याची विनंती करत आहोत. याचमुळे आम्ही 20 जुलै रोजीचा आदेश रद्द केला असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या 20 जुलै रोजीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2021 आणि डिसेंबर 2022 मधील स्वत:च्या आदेशांमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला जाऊ नये असे म्हटले होते.
उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने 20 जुलै रोजी एका याचिकेवर सुनावणी केली होती. अधिकारी यांनी भादंविचे कलम 153- अ अंतर्गत गुन्हा केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने याचिकेला पोलीस प्राधिकरणाने तक्रार मानून तपास करावा असा आदेश दिला होता.









