समन्सला विशेष न्यायालयाने दिली स्थगिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप नेते शहनवाज हुसैन यांना बलात्कार प्रकरणी एका विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्कार करत धमकी दिल्याचा आरोप करणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवर स्थानिक न्यायालयाकडून शहनवाज यांच्या विरोधात समन्स जारी करण्यात आला होता. या समन्सला विशेष न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शहनवाज यांना यापूर्वी 20 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता.
संबंधित न्यायाधीशांनी केवळ महिलेकडून कलम 164 अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या एका वक्तव्याची दखल घेतली. परंतु प्रत्यक्षात बलात्कारासारखी कुठलीच घटना घडली नसल्याचे दाखवून देणारे पुरेसे पुरावे असल्याचा दावा शहनवाज हुसैन यांनी स्वत:च्या याचिकेत केला होता.
एप्रिल 2018 मध्ये नवी दिल्लीतील एका फार्महाउसमध्ये हुसेन यांनी गुंगी आणणारे पदार्थ खायला दिले होते, यानंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला होता असा दावा एका महिलेने केला आहे. तर संबंधित महिला ही घटस्फोटाप्रकरणी स्वत:चे दु:ख व्यक्त करण्यासाठी आली होती, यादरम्यान ती रडत होती, या व्यतिरिक्त तेथे काहीच घडले नसल्याचा दावा हुसैन यांनी केला आहे.









