टप्पाबद्ध पद्धतीने हटविणार आय-सीआरआर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेकडून 19 मे रोजी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर देशात बँकांमध्ये रोख रक्कम वाढली होती. ही रोकड नियंत्रित करण्यासाठी आरबीआयने इंक्रीमेंटल कॅश रिझर्व्ह रेशियो (आय-सीआरआर) लागू केला होता, आता शनिवारपासून टप्पाबद्ध पद्धतीने हटविण्यात येणार आहे.
आरबीआयच्या निर्णयानुसार आयसीआरआर 7 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे समाप्त होणार आहे. शनिवारी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी आयसीआरआर 25 टक्क्यांनी कमी केला जाईल. यानंतर 23 सप्टेंबर रोजी आयसीआरआरचा 25 टक्के हिस्सा आणखी हटविला जाईल. उर्वरित 50 टक्के 7 ऑक्टोबर रोजी हटविण्यात येणार आहे.
इंक्रीमेंटल कॅश रिझर्व्ह रेशियो हे आरबीआच्या पतधोरण उपकरणाचा हिस्सा आहे. याचे लक्ष्य व्यवस्थेत रोखतेचा पुरवठा अन् महागाई नियंत्रित करणे आहे. बँकांमध्ये रोख रकमेचा साठा वेगाने वाढू लागल्यास रिझर्व्ह बँक सीआरआरसोबत अतिरिक्त आयसीआरआर सुरू करते. यानुसार बँकांना रिझर्व्ह बँकांना पूर्वीपेक्षा अधिक रोख रक्कम ठेवावी लागते.
आयसीआरआरमुळे बँकांना आरबीआयकडे अधिक रोख रक्कम जमा करावी लागते, यामुळे बँकांकडे कर्ज वितरणासाठी कमी पैसे शिल्लक राहतात. अशा स्थितीत आयसीआरआर संपुष्टात आल्यास बँकांना त्यांचा पैसा मिळू शकेल, यामुळे बँका अधिक प्रमाणात कर्जवाटप करू शकतील.









