भडकाऊ भाषणप्रकरणी निर्दोष
वृत्तसंस्था/ लखनौ
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना खासदार-आमदार न्यायालयाकडून (सत्र) मोठा दिलासा मिळाला आहे. द्वेषपूर्ण भाषण दिल्याच्या आरोपातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात, खासदार-आमदार न्यायालयाने (दंडाधिकारी) 27 ऑक्टोबर 2022 रोजी आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना आमदारकी गमवावी लागली होती. या शिक्षेविरोधात आझम खान यांनी सत्र न्यायालयात अपील केले. बुधवारी या प्रकरणावर खासदार-आमदार न्यायालयात (सत्र) सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आझम खान यांची भडकाऊ भाषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. तसेच न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द केला.
सत्र न्यायालयाने याप्रकरणी 70 पानांमध्ये निकाल दिला आहे. या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा उल्लेख करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आझम खान यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी त्यांना पुन्हा आमदारकी मिळण्याबाबत अजूनही साशंकता आहे. मुरादाबादच्या न्यायालयाने आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना छजलैट प्रकरणातही दोन वर्षांची शिक्षा सुनावलेली असल्यामुळे त्यांना आमदारकी बहाल करता येणार नाही.









