अटकेला न्यायालयाची तूर्त स्थगिती : चौकशीत सहकार्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना न्यायालयाकडून गुरुवारी दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तूर्तास त्यांच्या अटकेला स्थगिती दिली असून तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे.अमानतुल्लाह खान यांनी दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयात अंतरिम जामीन याचिका दाखल केली होती. ज्यावर न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय दिला आहे. दिल्लीच्या जामिया नगरमध्ये पोलीस पथकावर हल्ला करणे आणि न्यायालयाकडून घोषित गुन्हेगाराला फरार होण्यास मदत करण्याचा आरोप खान यांच्यावर आहे. दिल्लीच्या ओखला येथे आप आमदार खान हे तीन दिवसांपासून फरार होते.
सोमवारी त्यांच्या विरोधात एफआयआर नोंद झाल्यावरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. दिल्ली पोलिसांच्या अनेक पथकांनी उत्तरप्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये त्यांचा शोध चालविला होता. न्यायालयाने शावेज खानला फरार गुन्हेगार घोषित केले आहे. तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ज्या शावेजला पकडले होते, तो जामिनावर होता असा दावा अमानतुल्लाह खान यांनी केला होता. शावेज खानला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर अमानतुल्लाह खान आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता, तसेच शावेजला पोलिसांच्या कब्जातून सोडवत फरार करविले होते. अमानतुल्लाह यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला याप्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे.









