मार्चमध्ये परीक्षेची तयारी झाली नसल्यास जूनमध्येही सोडविता येणार पेपर
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नवीन अभ्यासक्रमाची ऊपरेषा जाहीर करताना नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्षात दोन परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयाद्वारे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावी यातील पहिली परीक्षा मार्च महिन्यात तर दुसरी जून महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्याला कोणतीही एक परीक्षा निवडण्याचे स्वातंत्र्य राहणार असून, विद्यार्थी दोन्हीही परीक्षा देऊ शकतील. ज्या परीक्षेत अधिक गुण मिळाले आहेत, त्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्यो यांनी दिली.
भगिरथ शेट्यो यांनी सांगितले की, गोवा शालान्त मंडळाने 2023-24 च्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. दोन सेमिस्टरचा पर्याय बदलून एकच अंतिम परीक्षा होणार असली, तरी यापुढे मार्चमध्ये ज्या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी नसेल त्यांना जूनमध्येच परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी हा पर्याय मार्चच्या परीक्षेत नापास होणाऱ्यांसाठी होता. यापुढे जे विद्यार्थी मार्चच्या परीक्षेस बसण्याच्या तयारीत नसतील, त्यांना जूनमधील परीक्षेस बसण्याचा पर्याय दिला जाईल, असेही ते म्हणाले.
दहावी आणि बारावीच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन सत्र परीक्षा घेण्यात येणार असल्याचा समज शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांमध्ये आहे. परंतु आता यापुढे मार्चमध्ये ज्या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी झाली नसेल त्यांना जूनमध्ये पुन्हा परीक्षा देण्यास वाव असल्याने हा समज करून घेण्याची गरज नसल्याचेही शेट्यो यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ‘एनसीईआरटी’ने नवा आराखडा तयार केला आहे. यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची तरतूद केली आहे. तसेच अकरावी व बारावीला स्थानिक भाषा सक्तीच्या राहणार आहेत. त्यातील किमान एक भाषा ही देशी असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. शिवाय विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांसाठी पाठ्यापुस्तके बनवली जाणार आहेत.









