अजूनही दमदार पावसाकडे साऱ्यांच्या नजरा
बेळगाव : पावसाचा जोर वाढल्याने साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारीही पावसाने चांगली साथ दिली. दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्यामुळे शहरातील फेरीवाले, व्यापाऱ्यांची काहीशी तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे. पाऊस पडत असला तरी अजूनही जोरदार पाऊस पडावा, अशीच अपेक्षा साऱ्यांची आहे. जोरदार पाऊस झाला तर नदी-नाले प्रवाहीत होऊ शकतात. याचबरोबर जलाशयांमध्येही पाणीसाठा होऊ शकतो. मात्र अजूनही तितका मोठा पाऊस होत नसल्याचे बोलले जात आहे. यावर्षी अधिक महिना आहे. त्यामुळे पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोमवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यावरील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. यावर्षी पहिल्यांदाच अशाप्रकारे पाणी साचल्याचे दिसून आले. या पावसामुळे गटारीदेखील तुडुंब भरून वाहत होत्या. काही ठिकाणी गटारींमध्ये कचरा अडकून पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामधून वाट काढताना साऱ्यांनाच कसरत करावी लागत होती. दिवसभर ढगाळ वातावरण आणि दमदार सरी कोसळल्यामुळे हवेत बऱ्यापैकी गारवा निर्माण झाला होता. पाऊस पडत असल्यामुळे बळीराजाही सुखावला आहे. या पावसामुळे शिवारातील कामे करण्यामध्ये शेतकरी गुंतला आहे. सध्या तण काढणे याचबरोबर शिवारातील इतर कामे करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यावर्षी उशिराने पाऊस आल्यामुळे भाताची उगवणही उशिरा झाली आहे. सध्या बऱ्यापैकी भात व सोयाबिन पिके बहरली आहेत. त्यामुळे शेतकरी खताची मात्रा देणे यावर भर देत आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे शहरात तसेच बाजारपेठेमध्ये काही ठिकाणी पाणी साचून होते.









