मार्च तिमाहीत नफा 19 हजार कोटीवर
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या तिमाहीचा नफ्याचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. 31 मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहित कंपनीने 19 हजार 299 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता कंपनीचा नफा हा जवळपास 19 टक्के वाढीव राहिला आहे तर कंपनीने चौथ्या तिमाहीमध्ये 1.13 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
मागच्या वषी समान तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 16 हजार 203 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. याच दरम्यान आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱया तिमाहीमध्ये रिलायन्सने 15792 कोटी रुपयांचा निव्वळ नफा जमवला होता. तिसऱया तिमाहीच्या तुलनेमध्ये चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये जवळपास 22 टक्के इतकी वाढ नोंदली गेली आहे. दुसरीकडे दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणाऱया रिलायन्स जियो कंपनीने 4716 कोटी रुपयांचा मार्चच्या तिमाहीमध्ये नफा मिळवल्याची माहिती आहे. हा नफा 13 टक्के अधिक असल्याचे सांगितले जाते. मागच्या वषी समान तिमाहीमध्ये 4173 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱया तिमाहीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा 4638 कोटी रुपये राहिला होता.