भारतीय फुटबॉल संघाचे अधिकृत किट व व्यापारी प्रायोजक म्हणून निवड
वृत्तसंस्था /मुंबई
‘रिलायन्स रिटेल’च्या विस्तृत ‘फॅशन’ आणि ‘लाईफस्टाईल पोर्टफोलिओ’मधील स्पोर्ट्सवेअर ब्रँड ‘परफॉर्मेक्स’ची अखिल भारतीय फुटबॉल महासंघासमवेत (एआयएफएफ) भागीदारी सुरू झाली असून त्यांना भारतीय फुटबॉल संघाचे अधिकृत किट आणि व्यापारी प्रायोजक बनविण्यात आले आहे. या बहुवर्षीय भागीदारीमुळे ‘परफॉर्मेक्स’ला केवळ खेळाच्या सर्व प्रकारांसाठीचे किट तयार करण्याचाच विशेष अधिकार मिळणार नाही, तर ‘एआयएफएफ’चे सर्व सामने, प्रवास आणि प्रशिक्षणासाठीचे पोशाख यासाठी ते एकमेव पुरवठादार राहतील. यात पुरुष, महिला आणि युवा संघांचा समावेश राहील. याव्यतिरिक्त, व्यापारी प्रायोजक म्हणून ‘परफॉर्मेक्स’कडे या साहित्याचे उत्पादन आणि किरकोळ विक्री करण्याचे अधिकार देखील असतील.
भारतीय फुटबॉल संघ थायलंडमध्ये कालपासून सुरू झालेल्या आणि 10 सप्टेंबरपर्यंत चालणार असलेल्या 49 व्या किंग्स कपदरम्यान आकर्षक नवीन किटसह दिसेल. या भागीदारीबद्दल बोलताना ‘रिलायन्स रिटेल फॅशन अँड लाइफस्टाइल’चे अध्यक्ष आणि सीईओ अखिलेश प्रसाद म्हणाले की, ‘एआयएफएफ’सोबतची आमची भागीदारी जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतात फुटबॉलमध्ये मोठी क्षमता आहे आणि भारतीय फुटबॉल संघाला येत्या काही वर्षांत महत्त्व प्राप्त होताना दिसून येईल. ही भागीदारी ‘परफॉर्मेक्स’द्वारे भारतात खेळांना आवाक्यात आणण्याच्या आमच्या आकांक्षेशी सुसंगत आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. इंडियन सुपर लीग आणि रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स अकादमीसह सध्या भारतातील फुटबॉल क्षेत्रात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आणि सुविधा सक्रिय असून त्यामुळे अधिकाधिक तऊणांना आकर्षित करण्यासाठी फुटबॉल सज्ज झाला आहे. ‘एआयएफएफ’चे सरचिटणीस डॉ. शाजी प्रभाकरन यांनी म्हटले आहे की, आम्ही आमच्या नवीन किट पार्टनर ‘परफॉर्मेक्स’चे ाारतीय फुटबॉल परिवारात स्वागत करतो. मला खात्री आहे की, खेळाडू आणि संघांना नवीन किट आवडेल आणि त्यांना त्यांचा सर्वोत्तम खेळ करण्यासाठी त्यातून प्रेरणा मिळेल. भारताने यावर्षी तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि त्या सर्व जिंकल्या. यात तीन राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा, इंटर कॉन्टिनेन्टल कप आणि सॅफ स्पर्धेचा समावेश राहिला. या तीन स्पर्धांतील 11 सामन्यांत भारत अपराजित राहिला आणि सात वेळा विजयी झाला. त्याच्या जोरावर भारताने मागील पाच वर्षांत प्रथमच फिफा क्रमवारीच्या पहिल्या 100 संघांत प्रवेश केला.









