वृत्तसंस्था/ मुंबई
कोल्ड्रिंक व स्नॅक्स उद्योगामध्ये उतरण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने आता आपल्या प्रयत्नांना धार चढवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची सहकारी कंपनी असणाऱ्या कंझुमर प्रोडक्टस् लिमिटेड जागतिक स्तरावर गणल्या जाणाऱ्या ‘जनरल मिल्स’ सोबत भागीदारी करणार असल्याचे म्हटले जात आहे. जनरल मिल्ससोबत भागीदारीच्या माध्यमातून त्यांची उत्पादने भारतामध्ये उपलब्ध केली जाणार आहेत.
अॅलन्स बगल्सची उत्पादने भारतात लवकरच रिलायन्सतर्फे सादर केली जाणार असल्याची माहिती आहे. अॅलन्स बगल्सची उत्पादने इंग्लंड, अमेरिका आणि मध्यपूर्व देशांमध्ये लोकप्रियता मिळवून आहेत. या आंतरराष्ट्रीय कॉर्न चिप्स ब्रँडची मालकी ‘जनरल मिल्स’कडे आहे. भारतामध्ये स्नॅक्स उद्योगाला वाढता प्रतिसाद पाहूनच रिलायन्सने सदरची नवी भागीदारी केली असल्याचे सांगितले जात आहे.
अॅलन्स बगल्सची सुरुवात
अॅलन्स बगल्सची स्नॅक प्रकारातील उत्पादने अगदी 10 रुपयांपासून सुरु होतात. 1964 मध्ये क्रंची बगल्स चिप्स हे उत्पादन पहिल्यांदा कंपनीने लाँच केले होते. त्यानंतर वरील देशांमध्ये या कंपनीच्या उत्पादनांनी लोकप्रियता मिळवली होती. सुरुवातीला यांची उत्पादने भारतात केरळ राज्यात उपलब्ध होणार असून नंतर उर्वरीत भारतातील राज्यांमध्ये ती टप्याटप्याने उपलब्ध होतील.