गुजरातमधील कंपनीसोबत भागीदारी
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी एफएमसीजी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करत असून आगामी काळात या क्षेत्रात व्यवसायाची संधी शोधू पहात असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच पेप्सी व कोक यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने पॅम्पाचे सादरीकरण केले होते. कोला बाजारात रिलायन्सने उडी घेत पॅम्पा हे पेय आकर्षक सवलतीच्या किंमतीत सादर करत बाजारात एंट्री मिळवली. आता रिलायन्सची नजर ही देशातील आईसक्रीम बाजारपेठेवर असल्याचे समजते.

20 हजार कोटीची उलाढाल
ही बाजारपेठ भारतात 20 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीची आहे. आगामी काळात या क्षेत्रात प्रवेशासंबंधीचा निर्णय रिलायन्सकडून घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याकरीता गुजरातमधील इंडिपेंडन्स ब्रँडसोबत आईसक्रीम क्षेत्रात व्यवसाय विस्तारण्यासाठी रिलायन्स प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळते आहे.
इंडिपेंडन्स ब्रँडअंतर्गत मसाले, खाद्यतेल, डाळ, धान्ये आणि पॅकेज खाद्य पदार्थ विक्री केले जातात. या ब्रँडखाली आईसक्रीम उत्पादने सादर करण्यासाठी कंपनी गुजरातमधील एका कंपनीशी बोलणी करणार असल्याचीही माहिती आहे.









