46 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक घोषणा
वृत्तसंस्था/मुंबई
देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक सोमवारी आयोजीत करण्यात आली होती, ज्यात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कंपनीने एअर फायबर सेवा, विमा सेवा सुरु करण्याचे निश्चित केले आहे.
रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक पार पडली. 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी दिवशी कंपनी जिओ एअर फायबर सेवा सुरु करणार आहे. ही 5 जी वायफाय सेवा असून वायरविना फास्ट ब्रॉडबँड सेवा वापरता येणार आहे. यासोबतच कंपनी विमा व्यवसायातही उतरणार असल्याचे अंबांनी स्पष्ट केले. रिलायन्स इंडस्ट्रिजचे पुढील 5 वर्षासाठी चेअरमन व व्यवस्थापकीय संचालकपद मुकेश अंबानी हेच सांभाळणार आहेत.
कंपनी आगामी काळात लाइफ, जनरल आणि हेल्थ इन्शुरन्स (विमा) क्षेत्रात उतरणार आहे. रिलायन्स रिटेल मागच्या वर्षी 2 लाख 60 हजार 364 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला असून नफा 9181 कोटी रुपये इतका राहिला आहे. रिलायन्स रिटेलच्या एकूण स्टोअर्सची संख्या 18,040 वर पोहचली आहे.
जिओने मागच्या वर्षी 1,19,791 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला तर 45 कोटी अधिक ग्राहक जोडले आहेत. तर दुसरीकडे 2.6 लाख जणांना कंपनीने रोजगार दिला आहे. एप्रिल ते जून 2023 या अवधीत कंपनीचा निव्वळ नफा 16,011 कोटी रुपये राहिला आहे, तो मागच्या वर्षी 17,955 कोटी रुपये होता.









