मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीजला देशातील सर्वात मूल्यवान सूचीबद्ध कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) दुसऱया आणि एचडीएफसी बँक तिसऱया स्थानावर आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीत रिलायन्सने अव्वल स्थान पटकावले आहे.
‘2022 बरगंडी प्रायव्हेट हुरुन 500’ च्या पहिल्या दहाच्या यादीत समाविष्ट असलेल्या कंपन्यांचे एकूण मूल्य अंदाजे 226 लाख कोटी रुपये आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे 17.25 लाख कोटी रुपयांचे मूल्य आहे. दुसऱया क्रमांकावर असलेल्या टीसीएसचे मूल्य 11.68 लाख कोटी रुपये आहे.
भारतातील 500 सर्वात मूल्यवान कंपन्यांच्या यादीच्या दुसऱया आवृत्तीमध्ये, एचडीएफसी बँक 8.33 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह तिसऱया क्रमांकावर आहे. या यादीतील पहिल्या दहामध्ये, इन्फोसिस 6.46 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह चौथ्या स्थानावर आहे, तर आयसीआयसीआय बँक 6.33 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह पाचव्या स्थानावर आहे. या यादीत अदानी समूहाच्या दोन कंपन्यांना नवव्या आणि दहाव्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. या अहवालानुसार, ऊर्जा, किरकोळ, हॉटेल, रेस्टॉरंट आणि संबंधित क्षेत्रातील आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी मजबूत वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी, सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्राला गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण सहा लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
अनस रहमान जुनैद, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक, हुरुन इंडिया म्हणाले, महागाई आणि येऊ घातलेल्या मंदीमुळे भारतीय आयटी आऊटसोर्सिंग कंपन्यांना मोठय़ा व्यवहारांमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. यासोबतच पॉलिसी बाजार, पेटीएम, झोमॅटो आणि नायका सारख्या स्टार्टअप्समध्येही वाढ झाली आहे.