वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंटडस्ट्रिज सध्याला सेमीकंडक्टर निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याचा विचार करते आहे. यासंदर्भातला आढावा सध्याच्या काळात कंपनीकडून घेतला जात असल्याची माहिती आहे. चिपची वाढती मागणी व पुरवठा साखळी मजबुतीच्या गरजांची पूर्तता करण्याच्यादृष्टीने पाहता रिलायन्सने असा विचार केला आहे, असे म्हटले जात आहे. दूरसंचारपासून ते ऊर्जा अशा प्रत्येक क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रिजचे नाव जोडले जात आहे. सरकारच्या प्रोत्साहनाचा फायदा उठवण्याच्या दिशेने रिलायन्सचे प्रयत्न असून याअंतर्गत चिप निर्मितीचा विचार पुढे आला आहे. यासंदर्भात काही विदेशी चिप निर्मिती कंपन्यांशी रिलायन्स चर्चा करते आहे, असे सांगितले जात आहे. या क्षेत्रात उतरायचे की नाही याबाबत कंपनीने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचा खुलासाही रिलायन्सने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी भारत हा चिप निर्मितीतला प्रमुख देश बनेल अशी घोषणा केली होती. 2021 मध्ये त्यांनी यासंबंधीची घोषणा केली होती, पण भारतात अद्याप एकही चिप निर्मितीचा कारखाना सुरु झालेला नाही. वेदांता व तैवानची फॉक्सकॉन कंपनी यासंदर्भातली संधी शोधत असल्याचे समजते.
चिपची गरज दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये प्रकर्षाने जाणवताना दिसते आहे. 2021 मध्ये रिलायन्सला आपल्या परवडणाऱ्या स्मार्टफोनला बाजारात उतरवण्यासाठी उशीर झाला होता. रिलायन्सने सदरचा फोन गुगलसोबत बनवला होता.
रिलायन्स, टाटा कंपन्यांची एनवीडियाशी भागीदारी
अमेरिकेतील चिप निर्माती कंपनी एनवीडियाशी कॉर्प यांच्याशी रिलायन्स आणि टाटा ग्रुप या कंपन्यांनी एआय अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स प्रणालीच्या विकासासाठी भागीदारी करण्यात आल्याची माहिती आहे. एआय निगडीत सुपरकॉम्प्युटर, क्लाऊडस् आणि एआय अॅप्लीकेशन विकासासाठी भागीदारीतून सहकार्य घेतले जाणार असल्याचे समजते. टाटा कम्युनिकेशन्सही एनवीडियाची आगामी काळात भागीदारीच्या माध्यमातून आपल्या सेवांसाठी मदत घेणार आहे.









