सातारा :
सातारा शहरातील विसावा पार्क, देवी कॉलनी, यशवंत कॉलनी येथील भटक्या कुत्र्यांची ‘वनतारा’ मध्ये रवानगी करण्यात, अशी विनंती अर्जाद्वारे सातारा नगरपालिकेकडे मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय कदम यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेले कित्येक महिने, विसावा पार्क, देवी कॉलनी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, या भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिवस रात्र मोठ्या प्रमाणात रस्त्यावर एकत्र फिरत असतात. ही कुत्री रात्रभर या परिसरात मोठ्या प्रमाणात भुंकत असल्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांना मोठ्या प्रमाणात त्रास जाणवत आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स असल्यामुळे नागरिकांची कायम वर्दळ असते. या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर ही भटकी कुत्री भुंकत असतात. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. परंतू यावर नगरपालिका कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नाहीत. पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत आहे.
नगरपालिका कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून सोडत आहेत, असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात येत आहे. या विभागात परत ती कुत्री येत आहेत. निर्बिजीकरणामुळे कदाचित या कुत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे की, काय अशी शंका निर्माण होते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात भुंकत आहेत असे वाटते. तरी मुख्याधिकाऱ्यांनी, पेटा या संस्थेशी संपर्क साधून येथील सर्व भटकी कुत्री वनतारा मध्ये पाठवावित जेणेकरून तेथे त्यांची देखभाल योग्य त्या रितीने हाईल. तसेच बाहेरील देशातील पर्यटकांना भटकी कुत्री कशी असतात हे पहावयास मिळेल आणि साहाजिकच वनतारा सारख्या संस्थेला आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, अशी विनंती केली आहे.








