अमेरिकेचा हमासला स्पष्ट इशारा, इस्रायलचे जोरदार हल्ले, सीरियाची संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त
वृत्तसंस्था / तेल अवीव
हमासने आधी सर्व ओलिसांची मुक्तता केल्याशिवाय पॅलेस्टाईन संदर्भात कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी दिला आहे. इस्रायलनेही आता गाझापट्टी आणि लेबेनॉनवर वायुहल्ल्यांचे प्रमाण वाढविले असून भूमीवरील कारवाईसाठी वातावरण निर्मिती चालविली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये 600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला आहे.
मध्यपूर्वेतील या संघर्षाला आता 19 दिवस उलटून गेले आहेत. मात्र, तो थांबण्याऐवजी अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. इराणने उघडपणे हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांची पाठराखण केल्याने वातावरण अधिक बिघडत असून इस्रायलनेही हमासचा नायनाट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला आहे. इस्रायल सध्या तीन आघाड्यांवर युद्ध करीत आहे.
सीरियाची अतोनात हानी
गाझापट्टीतून हमास आणि लेबेनॉन आणि वेस्ट बँकमधून हिजबुल्ला या इस्लामी दहशतवादी संघटना इस्रायलवर अग्निबाणांचा मारा करीत आहेत. यात मंगळवारी सीरियाचीही भर पडली. सीरियातून इस्रायलवर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यामुळे इस्रायलच्या वायुदलाने सीरियावर जोरदार हल्ले करुन त्या देशाची संरक्षण यंत्रणा खिळखिळी केली असल्याचे वृत्त आहे. सीरियाच्या भूदलाच्या केंद्रांवर जोरदार हल्ले करण्यात आले. तसेच या देशाच्या विमानतळांचीही मोठी हानी झाली.
अमेरिका आयर्न डोम देणार
इस्रायलच्या स्वत:च्या आयर्न डोम संरक्षणाला अधिक बळ देण्यासाठी अमेरिका त्या देशाला अशा प्रकारची आणखी यंत्रणा पुरविणार आहे. आयर्न डोम तंत्रज्ञानाच्या आणखी दोन बॅटरीज आणि प्रक्षेपण यंत्रणा लवकरच पुरविली जाणार आहे. त्यामुळे अग्निबाणांच्या माऱ्यापासून इस्रायलचे सर्वंकष संरक्षण होणार आहे.
पाच हजारांहून अधिक ठार
इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या वायुहल्ल्यांमध्ये आतापर्यंत पाच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागाने केला आहे. मृतांमध्ये 2 हजार मुले आणि 1 हजाराहून अधिक महिला आहेत, असेही सांगण्यात येत आहे. इस्रायलने गाझापट्टीचा इंधन पुरवठा थांबविल्याने इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनांनाही आता हालचाली करणे अशक्य होत आहे. संघर्ष पिडितांपर्यंत साहाय्यता पोहचविणे अवघड झाले आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने प्रतिपादन केले. मात्र, इस्रायलने इंधन पुरवठा सुरु करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गाझापट्टीतील रुग्णालये वैद्यकीय साधने आणि वीज यांच्या अभावी ठप्प झाल्याचेही वृत्त आहे. रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. साहाय्यता पुरेशा प्रमाणात न पोहचल्यास येत्या तीन ते चार दिवसांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा युनोने दिला.
इंधन हमासकडून घ्या
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंतोनियो गुट्रेस यांच्या वादग्रस्त विधानावर इस्रायलने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. गुट्रेस यांना हमासचा एवढा पुळका आला असेल, तर युनोच्या वाहनांसाठी त्यांनी हमासकडूनच इंधन घ्यावे. हमासचे समर्थन करुन ते आमच्या जखमेवर मीठ चोळतात आणि इंधनाची मागणीही आमच्याचकडे करतात, हा मोठा विनोद असल्याची खोचक टिप्पणी इस्रायलने केली आहे.
अमेरिकेकडून एफ 16 विमाने नियुक्त
इस्रायलवर होणारा संभाव्य हल्ला लक्षात घेऊन अमेरिकेने आखाती प्रदेशात आपल्या एफ 16 या युद्धविमानांची एक तुकडी आणली आहे. मात्र, ही विमाने नेमकी कोठे स्थानापन्न करण्यात आली आहेत, याची माहिती देण्यात आलेली नाही. इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिल्याने अमेरिकेने ही पूर्वतयारी केल्याचे स्पष्ट करण्यात आले. इराणने आगीत तेल ओतणारी विधाने केली असून युद्ध लवकर थांबण्यासाठी तो देश साहाय्य करणार नाही, असे स्पष्ट होत आहे.









