मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : राज्यभरातील 67 कैद्यांचा समावेश
प्रतिनिधी /बेंगळूर
यंदा स्वातंत्र्यदिनी राज्यभरातील विविध कारागृहांमधील 67 कैद्यांची सद्वर्तणुकीच्या आधारे सुटका केली जाणार आहे. त्यात हिंडलगा कारागृहातील दोन कैद्यांचाही समावेश आहे. गुरुवारी बेंगळूरमध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 67 कैद्यांची मुक्तता, दूध दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढ करण्यास संमती तसेच अंगणवाडी केंद्रांना वितरित होणारी अंडी महिला-बालकल्याण खात्यामार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कायदा आणि संसदीय कामकाजमंत्री एच. के. पाटील यांनी ही माहिती दिली. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी सद्वर्तणुकीच्या आधारावर कैद्यांची कारागृहातून सुटका केली जाते. यंदा राज्यातील विविध कारागृहांमधून 67 कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यात हिंडलगा कारागृहातील 2, बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातील 24, म्हैसूरमधील 8, कलबुर्गी 5, शिमोगा 6, धारवाड 2, बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहातील 8 कैद्यांचा समावेश आहे.
महिला-बालकल्याण खात्यामार्फत अंडी खरेदी
अंगणवाडी केंद्रांमध्ये मुले आणि बाळंतीणींना वितरण होणारी अंडी निकृष्ट आणि खराब असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आता येथे वितरण होणारी अंडी महिला आणि बालकल्याण खात्यामार्फतच खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेंगळूरच्या शिवाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात चरक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण, व्हिक्टोरिया हॉस्पिटल आवारात 26 कोटी रुपये खर्चून नेफ्रो युरॉलॉजी विभागासाठी इमारत निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घण्यात आला. शिवाय राज्य रस्ते नियंत्रण आणि विकास प्राधिकरण स्थापनेलाही संमती दर्शविण्यात आली.









