तीन कर्मचारी मुख्यमंत्रिपदकाने सन्मानित
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांची सुटका करण्यात आली. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी सरकारच्या आदेशानुसार स्वातंत्र्यदिनी त्यांची सुटका केली.
सिद्धाप्पा व्यंकाप्पा पुजेरी, रा. अज्जनकट्टी, ता. गोकाक, माणिक इराप्पा अळवणी, रा. हिरेमुनवळ्ळी, ता. खानापूर या दोन कैद्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांची सुटका करण्यात आली. तत्पूर्वी कारागृहात कृष्णकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षारक्षकांनी मानवंदना दिली.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन कारागृहासाठी वैशिष्ट्यापूर्ण ठरला आहे, असे मुख्य अधीक्षकांनी सांगितले. मुख्यमंत्री पदक जाहीर झालेल्या तीन कर्मचाऱ्यांना यावेळी पदक बहाल करण्यात आले. कै. रमेश चिगरी यांची पत्नी शैला चिगरी, शिर्सी कारागृहाचे मुख्य अधीक्षक मंजुनाथ नायक, बैलहोंगल तालुका उपकारागृहाच्या गंगव्वा नंगन्नावर यांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
यावेळी कारागृहाचे प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के., वाय. एस. नायक, बसवराज बजंत्री, रमेश कांबळे, दंडाईनवर आदी उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन केले.









