इस्लामाबाद / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील राजू पिंडारे नामक व्यक्तीची पाकिस्तानने सुटका केली आहे. ते 44 वर्षांचे आहेत. पाच वर्षांपूर्वी ते घरातून बेपत्ता झाले होते. नंतर ते भारताच्या सीमारेषेपर्यंत गेले होते आणि त्यांनी चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या प्रदेशात प्रवेश केला होता. त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी अटक केली होती. भारताला याची माहिती मिळताच त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानकडे दाद मागण्यात आली होती. पाकिस्तानने आता त्यांची सुटका केल्याने ते भारतात आले आहेत.
त्यांना भारतीय अधिकाऱयांकडे सोपविण्यात आले. अमृतसरच्या रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्यात आले आहे. आवश्यक ती चौकशी केल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या हाती देण्यात येईल, असे भारताच्या विदेश व्यवहार विभागाने स्पष्ट केले. खांडवा जिल्हय़ाचे पोलीस महानिरीक्षक सुभाष शर्मा यांनी यासंबंधी पत्रकारांना माहिती दिली असून आपण यासंदर्भात खांडवा पोलिसांच्या सातत्याने संपर्कात आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.









