सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
कोंकणी साहित्यामध्ये रामायण महाकाव्याचा अनुवाद हा मैलाचा दगड आहे. आद्य महाकवी वाल्मिकींच्या रामायणात बौद्धिक आव्हाने अवश्य आहेत. तर्कशास्त्र आणि विज्ञानाला न पटणारे काही प्रसंगही आहेत. परंतू संस्कृती आणि समाज व्यवस्थेला बळकटी प्राप्त करून देण्याची क्षमता असलेल्या या महाकाव्यात मानवी जीवन अर्थपूर्ण बनविण्याची ताकद आहे ही गोष्ट नजरेआड करता येणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अॅड. उदय भेंब्रे यांनी केले. कुंडई येथील श्रीनवदुर्गा देवस्थानच्या मंडपात सांगे येथील संजना प्रकाशनने आयोजित केलेल्या अनुवादित संपूर्ण रामायणाच्या विमोचन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी साहित्यिक दुर्गाकुमार नावती, अरविंद भाटीकर, लेखक माणिकराव गावणेकर तसेच प्रकाशक दिनेश मणेरीकर व्यासपीठावर उपस्थित होते. अरविंद भाटीकर म्हणाले की वयाच्या 93 व्या वर्षी संपूर्ण रामायणाचा अनुवाद पूर्ण करून त्याला ग्रंथस्वरुप प्राप्त करून देणारे माणिकराव गावणेकर हे अभिनव उदाहरण आहे. रामायण हे सद्यस्थितीत समाजासाठी दिशादर्शी आहे. अनुवाद ही क्लिष्ट कला असून ते सामान्य माणसाचे काम नव्हे. त्यासाठी लेखक प्रशंसेस प्रात्र आहेत. लेखकाच्या मनोगतामध्ये वाल्मिकी रामायणातील बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्कींधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तराकांड या सात भागांच्या लिखाणतील सार आणि दृष्टी यावर विस्तृत उहापोह करण्यात आला. त्यांचे मनोगत त्यांची कन्या वृंदा कामत यांनी वाचकांसमोर सादर केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात दुर्गाकुमार नावती यांनी रामायणाचा प्रसार, प्रचार, व्याखानादी माध्यमातून होणे अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. सिया पंडित, सुमेधा नायक व गायत्री केळेकर यांचा विशेष योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला कोकणी लेखक आणि विचारवंत यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोघ बुडकुले यांनी केले तर स्वागत आणि आभार प्रकटन दिनेश मणेरीकर यांनी केले.









