इराणचा अमेरिकेसोबत करार : कतारकडून मध्यस्थी
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणच्या कैदेतून स्वत:च्या 5 नागरिकांची मुक्तता करविण्याकरता अमेरिकेने एक करार केला आहे. याच्या अंतर्गत अमेरिका स्वत:च्या नागरिकांच्या मुक्ततेच्या बदल्यात दक्षिण कोरियात गोठविण्यात आलेले इराणचे 49 हजार कोटी रुपये जारी करणार आहे. या करारानुसार इराणने स्वत:च्या कुप्रसिद्ध एविन तुरुंगातून अमेरिकेच्या नागरिकांना बाहेर काढले असून त्यांना एका हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. इराणमध्ये अमेरिकन-इराणी वंशीयांच्या लोकांवर झालेल्या कारवाईचा मुद्दा अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमधील वादाचे कारण ठरला होता.
इराणमध्ये कैदेत असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या कुटुंबीयांनी दीर्घकाळापासून बिडेन प्रशासनावर त्यांच्या मुक्ततेसाठी दबाव निर्माण केला होता. इराण लवकरच या कैद्यांना अमेरिकेच्या स्वाधीन करणार असल्याचे मानले जात आहे. तर 49 हजार कोटी रुपये थेट इराणच्या हाती सोपविले जाणार नाहीत. तर कतारच्या सेंट्रल बँकेत ही रक्कम जमा केली जाणार आहे.
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे कोलमडून गेलेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी 49 हजार कोटी रुपये उपलब्ध होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. इराणचा 41 लाख कोटी रुपयांचा निधी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे विविध देशांमध्ये अडकून पडला आहे. इराणमध्ये कैदेत असलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी ही घडामोड एखादे दुस्वप्न संपण्यासारखे असल्याचे उद्गार अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी काढले आहेत.
अमेरिकेच्या नागरिकांची पूर्णपणे मुक्तता करण्यात यावी. इराणने त्यांना अवैध पद्धतीने ताब्यात घेतले होते असेही ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. तर कराराच्या अंतर्गत अमेरिका देखील स्वत:च्या तुरुंगात असलेल्या काही इराणी कैद्यांची मुक्तता करणार असल्याचे मानले जात आहे.









