अमेरिकेने इराणचे 49 हजार कोटी रुपये केले जारी : कतारच्या मध्यस्थीला यश
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणने अमेरिकेसोबत झालेल्या कराराच्या अंतर्गत 5 अमेरिकन कैद्यांची मुक्तता केली आहे. अमेरिकेचे पाचही नागरिक कतारची राजधानी दोहा येथून वॉशिंग्टनसाठी रवाना झाले आहेत. 5 निष्पात अमेरिकन नागरिक अखेर स्वत:च्या घरी परतत आहेत, या सर्वांनी अनेक वर्षांपर्यंत दु:ख झेलले आहे असे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी काढले आहेत.
अमेरिकेने इराणचे माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद आणि इराणी गुप्तचर मंत्रालयावर चुकीच्या पद्धतीने अमेरिकेच्या नागरिकांना ताब्यात घेतल्याप्रकरणी नवे निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने स्वत:च्या नागरिकांच्या मुक्ततेच्या बदल्यात दक्षिण कोरियात गोठविण्यात आलेले इराणचे 49 हजार कोटी रुपये जारी केले आहेत.
49 हजार कोटी रुपये थेट इराणला प्रदान करण्यात आलेले नाहीत. ही रक्कम दोहा येथील सेंट्रल बँकमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. अमेरिकन नागरिकांच्या जीवनाला राजकारणापेक्षा अधिक महत्त्व दिल्याप्रकरणी अध्यक्ष बिडेन यांचे आभार मानतो असे उद्गार मुक्तता झालेल्या कैद्यांपैकी एक सियामक नमाजी यांनी काढले आहेत.
इराणने मुक्तता केलेल्या अमेरिकन नागरिकांमध्ये 51 वर्षीय उद्योजक सियामक नमाजी यांच्यासोबत उद्योजक एमाद शार्गी, पर्यावरणवादी मोराद ताहबाज सामील आहेत. हे सर्व जण 5 वर्षांपेक्ष अधिक काळापासून इराणच्या एविन तुरुंगात कैद होते. अमेरिकेने सातत्याने या लोकांच्या अटकेला चुकीचे ठरविले होते.
इराण आणि अमेरिकेत कतारने तडजोड करविली होती. करारापूर्वी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या 9 फेऱ्या पार पडल्या होत्या. याच्या एक महिन्यांनी या कराराची घोषणा झाली होती. कराराच्या अंतर्गत इराणने स्वत:च्या कुख्यात एविन तुरुंगातून अमेरिकनांना बाहेर काढून एका हॉटेलमध्ये हलविले होते.









