केवळ एकच आंदोलन झाल्याने पोलीसही रिलॅक्स
बेळगाव : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केवळ एकच आंदोलन झाल्यामुळे उर्वरित सर्व मंडप रिकामी असल्याचे चित्र मंगळवारी दिसले. सुवर्ण गार्डन येथे एकही आंदोलन नसल्यामुळे अधिकारी व पोलीसही रिलॅक्स असल्याचे दिसले. अधिवेशनावेळी आंदोलनांमुळे मोठी गर्दी असणाऱ्या मंडपांमध्ये मंगळवारी शुकशुकाट पहायला मिळाला. सोमवारपासून कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांची गर्दी होती. परंतु दुसऱ्या दिवशी पंचमसाली समाजाचे एकमेव आंदोलन झाले. ते आंदोलन कोंडसकोप्प येथे असल्यामुळे सुवर्ण गार्डन येथील आंदोलनस्थळी शुकशुकाट होता. पंचमसाली आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्यामुळे, तसेच मोठ्या प्रमाणात आंदोलक दाखल होणार असल्याने पोलिसांनी इतर आंदोलनांना परवानगी दिली नसल्याची चर्चा सुरू होती. अधिवेशन सुरू झाल्यापासून संपेपर्यंत रोज किमान 10 ते 15 संघटना आंदोलन करीत असतात. याचा ताण पोलीस प्रशासनावर असतो. परंतु मंगळवारी आंदोलनांची संख्या कमी असल्यामुळे पोलीस रिलॅक्स मूडमध्ये दिसले. त्याचबरोबर इतर अधिकाऱ्यांनीही विश्रांती घेतली.









