कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट व्हॉईस संघटनेची मागणी
बेळगाव : राज्य सरकारने ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी मोफत बसपासचा आदेश नुकताच जाहीर केला. परंतु, त्यातील जाचक अटी पाहता काही मोजक्याच ग्रामीण भागातील पत्रकारांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने जाचक अटी दूर करून सर्वच पत्रकारांना मोफत बसपासची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सुवर्णविधानसौध परिसरात कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट व्हॉईस संघटनेच्यावतीने आंदोलन केले. पत्रकारांसाठी चार वर्षांचे कायमस्वरुपी पत्र देणे आवश्यक आहे. परंतु, सर्व पत्रकारांना हे पत्र देणे शक्य नाही. त्यामुळे ही किचकट प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील पत्रकार हे खेडेगावापर्यंत पोहोचून तेथील समस्या सरकारदरबारी मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना सरसकट मोफत बसपास देणे आवश्यक आहे.
पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा
त्याचबरोबर कोणताही अपघात असो अथवा दंगल, प्रत्येकवेळी पोलिसांच्या बरोबरीने पत्रकार कार्यरत असतात. जीव धोक्यात घालून त्यांची ही सेवा सुरू असते. परंतु, पत्रकारांना कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. यासाठी सर्व पत्रकारांना राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा. सरकारच्या वृत्त विभागातील रिक्त असलेल्या 300 जागांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव, बिदर, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.









