पाक संरक्षण मंत्र्यांच्या तोंडून बाहेर पडले सत्य
पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवाद्यांना पोसतो हे पूर्ण जगाला माहित आहे. अल-कायदा म्होरक्या ओसामा बिन लादेनपासून तालिबानचे अनेक नेते असो किंवा भारतात निर्दोष लोकांची हत्या करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबाचे क्रूर दहशतवाद्यांसाठी पाकिस्तानच आश्रयस्थान आहे. आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीच पाकिस्तान दहशतवाद्यांशी संबंध राखून असल्याचे कबूल केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबत असलेल्या साटलोट्याचा पूर्ण तपशीलच उघड केला.
भुतकाळात पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध राहिले आहेत, परंतु आता पाकिस्तानने हे सर्व संबंध तोडले आहेत असा दावा ख्वाजा आसिफ यांनी केला. नव्या घटनेत सामील नसल्याचा दावा करत पुढील काळात त्याची कबुली देण्याची सवयच पाकिस्तानला जडली आहे. पाकिस्तानचे माजी सैन्य हुकुमशहा जनरल परवेज मुशर्रफ यांनी स्वत:च्या मृत्यूच्या एक वर्षापूर्वी कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेची कबुली दिली होती.
जगासमोर चौकशीचे नाटक
आम्ही आमची चौकशी करू इच्छित नाही. जगाने येत आमची चौकशी करावी, ज्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, तेथे जाऊन दहशतवाद्यांचे अड्डा आहेत की नाही हे पाहिले जावे. भारत ज्या दहशतवाद्यांची नावे घेतो, ते आमच्या देशात आहेत का अन्यत्र कुठे आहेत हे जागतिक समुदायाने तपासावे असे ख्वाजा आसिफ यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
आम्ही दहशतवाद्यांसोबतचे संबंध अनेक वर्षांपूर्वीच तोडल आहेत. परंतु या दहशतवाद्यांचे नातेवाईक पाकिस्तानात राहत असावेत. हे दहशतवादी आमच्यासाठी इतके वाईट नाहीत जितके ते उर्वरित जगासाठी वाईट आहेत असे धक्कादायक वक्तव्यही ख्वाजा आसिफ यांनी केले आहे.









