शाहूवाडी प्रतिनिधी
अथणी तालुका चिकोडी येथील पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची नोंद असणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांच्या वाहकाची सतर्कता ,व शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व त्यांच्या टीमने दाखवलेली तत्परता यामुळे या अपहरण झालेल्या मुलांच्या नातेवाईकांचा तात्काळ शोध लागला. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे .
पोलीसांतून मिळालेल्या माहितीनुसार अथणी तालुका चिकोडी येथील मंजूनाथ दीपक सौदागर वय 12 ,लंकेश प्रभाकर उपार 13, शिवराज भरतराज लोणारी वय 14 या तीन मुलांचे अपहरण झाल्या बाबतची अथणी पोलिसात नोंद झाली होती .सदर मुले ही अथणीवरून एसटीने मिरज व मिरज ते कोल्हापूर रेल्वे प्रवास करून रत्नागिरी कडे जाणाऱ्या लातूर रत्नागिरी एसटी बस मध्ये बसले होते.
सदर एसटी बस मध्ये तीन मुलेच असल्याचे वाहक आर पी कवडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली . यावेळी आम्ही घरात न सांगता गणपतीपुळेला जात असल्याचे सदर बालकांनी सांगितले .ही माहिती मलकापूर आगारात वाहतूक नियंत्रक दिपक लाटकर यांना कळविण्यात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्याशी संपर्क साधून सदर तिन्ही मुले पोलिसांच्या ताब्यात दिली. अथणी पोलिसांशी संपर्क साधून सदर मुलांच्या नातेवाईकांची संपर्क साधला. एसटी वाहकाची तत्परता व पोलिसांची सतर्कता यामुळेच या अल्पवयीन तीन बालकांच्या अपहरण प्रकरणाचा पुढील अनर्थ टळला आणि नातेवाईकांनाही आपली मुले ताब्यात मिळण्याचा मार्ग सोयीचा झाला.









