भारत-कॅनडा वादात अमेरिकेकडून स्पष्टीकरण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत आणि कॅनडा यांच्यात खालिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र, ही स्थिती असली तरी भारताशी अमेरिकेचे संबंध सुदृढच राहतील, असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने दिले आहे. या प्रकरणात टोकाची भूमिका घेतली गेली तर अमेरिकेचे भारताशी असणारे संबंध बिघडू शकतात, असा इशारा त्या देशाचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी दिल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. अमेरिकेच्या दूतावासाने या वृत्ताचे खंडन केले आहे. गार्सेटी यांनी दिलेल्या कथित इशाऱ्याचे वृत्त अमेरिकेची एक वृत्तसंस्था ‘द पॉलिटिकल’ ने बुधवारी दिले होते. तथापि, अमेरिकेच्या दूतावासाच्या प्रवक्त्याने अधिकृतरित्या हे वृत्त नाकारले आहे. गार्सेटी हे भारत आणि अमेरिका यांच्यात संबंध आणखी बळकट व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील सरकारे एकमेकांच्या अधिकाधिक नजीक आणण्यासाठी ते सदैव कार्यरत असतात. त्यामुळे या वृत्तात केंणतेही तथ्य नाही. गार्सेटी आणि भारत यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी ते जीवाचे रान करीत आहेत. त्यामुळे बिनबुडाच्या वृत्तांवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.









