अमेरिकेचे खासदार श्री ठाणेदार भारताच्या दौऱ्यावर : द्विपक्षीय संबंध होणार वृद्धींगत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनची वाढती आक्रमकता आणि युक्रेन संकटामुळे निर्माण झालेल्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी भारत आणि अमेरिकेदरम्यान एक स्थायी भागिदारी विशेष स्वरुपात संरक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे खासदार श्री ठाणेदार यांनी रविवारी नवी दिल्लीत हे उdदगार काढले आहेत. भारतासोबतचे संबंध अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत अमेरिकेच्या संसदेत निर्माण झाल्याचे ठाणेदार यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. अमेरिकेत खासदार असलेले ठाणेदार हे मूळचे बेळगावचे आहेत.
15 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक लाल किल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनासह अन्य कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी भारतात आलेल्या अमेरिकेच्या खासदारांच्या समुहात ठाणेदार यांचा समावेश आहे. भारतासोबतच्या घनिष्ठ संबंधांकरता अमेरिकेत दोन्ही पक्षांचे समर्थन आहे. 23 जून रोजी अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक दोन्ही पक्षांकडून झालेल्या स्वागतातून हे स्पष्ट झाले होते असे ठाणेदार यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनावेळी स्वागत करण्याची संधी मला मिळाली होती. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण होता. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यातील केमिस्ट्री आणि मैत्रीने आम्ही द्विपक्षीय संबंधांचा नवा अध्याय लिहित आहोत याचे संकेत दिले आहेत. आमच्या भारत दौऱ्याचा उद्देश याच संबंधांना दीर्घकालीन मैत्रीत रुपांतरित करणे असल्याचे उद्गार ठाणेदार यांनी काढले आहेत.
दोन्ही देशांना चीनकडून धोका
अमेरिकेचे खासदार भारतासोबतचे संबंध सुधारण्याकरता काम करू इच्छितात. अमेरिकेला चीनकडून मोठा धोका निर्माण झाला आहे. तर युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे त्या देशाकडेही साशंक नजरेने पहावे लागत आहे. सद्यकाळात जगभरात अत्यंत अस्थिरता आहे आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातही अस्थिरता आहे. भारतासोबतचे संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यानेच अमेरिकेचे हे शिष्टमंडळ दौऱ्यावर आले आहे. तसेच मोदींनी आम्हाला विशेष स्वरुपात भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार असल्याने दिल्ली दौऱ्यासाठी आमंत्रित केले होते असे ठाणेदार यांनी मुलाखतीत सांगितले आहे.
अमेरिकेच्या खासदारांचे शिष्टमंडळ
अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना आणि खासदार मायकल वाल्ट्ज करत आहेत. दोघेही भारत आणि भारतीय-अमेरिकेच्या द्विपक्षीय काँग्रेसनल कॉकसचे सह-अध्यक्ष आहेत. युक्रेन युद्ध आणि चीनची आक्रमकता पाहता भारतासोबतचे संबंध अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचा मतप्रवाह काँग्रेस (अमेरिकेची संसद)मध्ये असल्याचे ते म्हणाले.
लढाऊ विमानांच्या इंजिन निर्मितीत सहकार्य
भारतात लढाऊ विमानाच्या इंजिन निर्मितीसाठी अमेरिकन इंजिन निर्माता कंपनी जीई एअरोस्पेस आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) दरम्यान कराराकरता संसदेकडून समर्थन दिले जाणार असल्याचे ठाणेदार यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदींच्या अलिकडच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान जीई एअरोस्पेस आणि एचएएलने भारतात एफ-414 इंजिनच्या निर्मितीसाठी एका सहकार्य करारावर स्वाक्षरी केली होती. याचबरोबर भारत अमेरिकेकडून 31 एमक्यू-9बी हाय अल्टीट्यूड लाँग एंड्योरेन्स ड्रोन खरेदी करणार आहे. दोन्ही करारांकरता अमेरिकेत अनुकूल प्रतिक्रिया मिळणार आहे. चीनची आक्रमकता आणि त्याच्या अनुचित व्यापार धोरणे पाहता अमेरिका भारताकडे एक मजबूत भागीदार म्हणून पाहत आहे. हे सहकार्य चीन आणि रशियाला कठोर संदेश देण्यास मोठी मदत करणार आहे. तर रशियासोबतच्या स्वत:च्या संबंधांवर भारत पुनर्विचार करेल अशी अपेक्षा असल्याचे ठाणेदार म्हणाले.
भारताकडून जबरदस्त प्रगती
माझ्या आयुष्यातील 24 वर्षे मी भारतात घालविली आहेत. भारताने स्वातंत्र्यानंतर मोठी प्रगती केली आहे. काही वर्षांपूर्वी भारत 10 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश होता. तर आता पाचव्या स्थानी असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार आहे. भारताच्या यशाचा जल्लोष करण्यासाठी मी येथे आलो आहे.
– श्री ठाणेदार, अमेरिकन खासदार









