क्वाड बैठकीपूर्वी विदेशमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ टोकियो
भारत आणि चीन यांच्यात असलेल्या सीमा वादात कुठल्याही त्रयस्थाच्या भागीदारीची शक्यता विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी फेटाळून लावली आहे. हा मूळ स्वरुपात द्विपक्षीय मुद्दा असल्याने दोन्ही देशांनीच सोडवायचा आहे, चीनसोबतचे भारताचे संबंध सामान्य नाहीत, यामागील कारण चीनने 2020 मध्ये सीमेवर सैन्य तैनात करून करारांचे उल्लंघन करणे होते असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
भारत आणि चीनमधील वाद सोडविण्यासाठी आम्ही अन्य देशांकडे पाहणार नाही. ज्या दोन देशांदरम्यान वाद आहे, चर्चा केवळ त्या दोघांमध्येच व्हायला हवी आणि अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये कुठल्याही त्रयस्थाचा हस्तक्षेप नको असे जयशंकर यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. जयशंकर हे क्वाड विदेश मंत्र्यांच्या बैठकीसाठी जपानची राजधानी टोकियोच्या दौऱ्यावर होते.
चीनसोबतचे आमचे संबंध फारसे चांगले नाहीत. 2020 मध्ये कोरोना संकटकाळादरम्यान चीनने सीमाक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करत करारांचे उल्लंघन केले होते. यामुळे झटापड झाली आणि दोन्ही देशांची जीवितहानी झाली होती असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
चीनकडून सैन्य तैनात करण्यात आल्याचा परिणाम अद्याप जारी आहे, कारण हा मुद्दा पूर्णपणे निकालात निघालेला नाही. चीनसोबत सध्या संबंध चांगले नाहीत, सामान्य नाहीत, एक शेजारी म्हणून आम्ही चांगल्या संबंधांची अपेक्षा करतो, परंतु नियंत्रण रेषेचा आदर केला आणि पूर्वीच्या करारांचे पालन केले तरच हे घडू शकते असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
चर्चेद्वारे तोडगा काढण्याची गरज
भारत-चीन संबंधांचा जागतिक विषयांवरही महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. कारण दोन्ही देश महत्त्वाची शक्ती आहेत. दोन्ही देशांदरम्यान एक समस्या असून त्यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाण्याची गरज असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
2020 पासून आमने-सामने
विदेशमंत्री जयशंकर यांनी चीनचे विदेशमंत्री वांग यी यांच्यासोबत एसीसीओ परिषदेच्या व्यतिरिक्त झालेल्या भेटीत सीमा वादाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. ही भेट कजाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे झाली होती. भारतीय आणि चिनी सैन्य मे 2020 पासून आमने-सामने आहे आणि सीमा वाद पूर्णपणे सोडविता आलेला नाही. परंतु दोन्ही देशांमधील संघर्षाचे काही मुद्दे निकाली काढण्यात आले आहेत. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत कोर कमांडर स्तरीय चर्चेच्या 21 फेऱ्या पार पडल्या आहेत.









