शेखर रणखांबे दिगदर्शित लघुचित्रपटास नॅशनल ज्युरी ॲवार्ड : शहर परिसरात चित्रीकरण : स्थानिक कलाकारांचा मोठा सहभाग
सांगली प्रतिनिधी
देशातील सगळ्यात मोठ्या माध्यमात पाऊल भक्कम पाय रोवणं, ही तशी फार सोपी गोष्ट नाही. पण अविरत प्रयत्नातून आणि ताकदीने पराकाष्टेतून छोटे छोटे लघुपटसुद्धा तुम्हाला मोठं व्यासपीठ मिळवून देऊ शकतात आणि दिग्दर्शक म्हणून तुमची ओळख मजबूत होत जाते, हे सिद्ध करुन दाखवलं आहे, पेडच्या शेखर बापू रणखांबेनी छोटयाशा खेड्यातून या मोठ्या क्षेत्रात काम करत त्याने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेतली आहे. नुकताच त्याच्या ‘रेखा’ या शॉर्टफिल्मला ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन फिक्शन गटात स्पेशल ज्युरी अवार्ड मिळाले असून यामुळे सांगलीच्या नावलौकीकात मोठी भर पडली आहे.
रवि जाधव फिल्म्स प्रस्तुत, मेघना जाधव निर्मित आणि शेखर बापू रणखांबे’ दिग्दर्शित ‘रेखा’ या लघुपटाने या आधीही अनेक पारितोषिके पटकाविली आहेत. सांगलीतील काही कलाकारांना घेवून शहर परिसरातच चित्रीकरण करून ‘रेखा’ या शॉर्टफिल्मचा जगभर डंका गाजविला आहे. ही शॉर्टफिल्म सांगली परिसरातील भाजी मंडई, बसस्टॉप आदी परिसरात शुट झाली आहे. तिची गतवर्षी भारतीय चित्रपट महोत्सव गोवा (इफ्फी) येथे अधिकृत निवड झाली. महाराष्ट्र शासनाच्या स्वराज्य लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन पुरस्कार मिळाले. पुणे येथील आरोग्य फेस्टिवल, द एम्टी फिल्म फेस्टीवल अक्षर मानव लघुपट महोत्सव, अरुणोदय फिल्म फेस्टिव्हल अहमदनगर, प्रतिबिंब फिल्म फेस्टीव्हल लोकराजा राष्ट्रीय लघुपट महोत्सव असे अनेक महोत्सव या चित्रपटाने गाजवले आहेत. गेल्या महिन्यातच जर्मनीतील बर्लिन फेस्टिव्हलमध्येही यास दोन पुरस्कार मिळाले आहेत. तर स्टुअर्टगार्ड व मेलबोर्न फेस्टीवलसाठीही याची निवड झाली होती.
‘रेखा’ चे छायाचित्रण प्रताप जोशी यांचे असून संकलन वैभव जाधव, वेशभूषा आणि रंगभूषा मंगेश गायकवाड, ध्वनी संयोजन मंदार कमलापूरकर आणि सचीदानंद टीकम आदींनी केले आहे. तसेच यामध्ये सांगली जिल्यातील माया पवार हिच्यासह तमीना पवार, सत्याप्पा मोरे, वैशाली केंदळे, विशाल शिरतोडे, उमेश मालन, कुलभूषण काटे, गौतम कांबळे, अनुराधा साळुंखे, गजानन सुर्यवंशी, सुरज बाघमोडे आदींचा सहभाग आहे. तर सांगलीच्याच विक्रम शिरतोडे, लखान चौधरी, किसन चव्हाण, कुलदीप देवकुळे, सचिन ठाणेकर आदींनी इतर धुरा सांभाळली आहे.