- नवव्या मुख्यमंत्री : पंतप्रधानांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी : प्रवेश वर्मांसह 6 मंत्रीही शपथबद्ध
- शपथबद्ध झालेले मंत्रिमंडळ व खाती :
- रेखा गुप्ता (मुख्यमंत्री) : गृह, वित्त, सेवा, दक्षता, नियोजन
- प्रवेश वर्मा (उपमुख्यमंत्री) : शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक
- आशिष सूद : महसूल, पर्यावरण, अन्न आणि नागरी पुरवठा
- मनजिंदर सिंग सिरसा : आरोग्य, शहरी विकास, उद्योग
- रवींद्र इंद्रराज सिंग : समाज कल्याण, अनुसूचित जाती/जमाती व्यवहार, कामगार
- कपिल मिश्रा : पाणी, पर्यटन, संस्कृती
- पंकज कुमार सिंग : कायदा, कायदेविषयक व्यवहार, गृहनिर्माण.
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील शालीमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता (50) यांनी गुरुवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर शपथ घेतली. दिल्लीचे लेफ्टनंट जनरल व्ही. के. सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला आणि एकंदर नवव्या मुख्यमंत्री बनल्या असून आता दिल्लीत ‘रेखा’ राजवट सुरू झाली आहे. गुप्ता यांच्या आधी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांनीही मुख्यमंत्रिपद भूषविले होते. रेखा गुप्ता यांच्यासोबत इतर 6 जणांनी रामलीला मैदानावर मंत्रिपदाची शपथ घेतली असून सर्वांना खात्यांचे वाटपही करण्यात आले आहे.
27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता पुन्हा एकदा दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताना कॅबिनेट मंत्री प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग हे मंत्रीही उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी विजयाचे चिन्ह दाखविले. पदभार स्विकारल्यानंतर सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपल्या सहमंत्र्यांसमवेत यमुना तिरी जात वासुदेव घाटावर सायंआरती व पूजा केली. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा हेसुद्धा आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वासुदेव घाटावर पोहोचले होते.
रेखा गुप्ता ह्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या असून त्या शालीमार बाग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. रेखा गुप्ता यांच्यानंतर प्रवेश वर्मा यांनी दिल्ली सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ते आमदार झाले. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत हरवून ही जागा जिंकली. निवडणूक जिंकल्यापासून प्रवेश वर्मा सतत चर्चेत होते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील सर्वात प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात होते. आता ते रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. प्रवेश वर्मा यांच्यासोबत आशिष सूद यांनीही शपथ घेतली. ते जनकपुरीचे आमदार असून ते दिल्लीतील पंजाबी समुदायापैकी एक मोठा चेहरा आहेत. आशिष सूददेखील पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. राजौरी गार्डन मतदारसंघातील आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनाही रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. ते तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत.
दिल्लीच्या नवीन मंत्रिमंडळात कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज सिंह आणि पंकज कुमार सिंह यांचाही समावेश करण्यात आला. कपिल मिश्रा करावल नगरमधून जिंकले आहेत. तर रवींद्र इंद्रराज हे बवाना राखीव जागेवरून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. विकासपुरीमधून विजयी झालेले आमदार पंकज सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकंदर सात जणांनी गुरुवारी शपथ घेतली.
मान्यवरांची उपस्थिती
रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजप नेत्यांनाही सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय, अनेक एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. चंद्राबाबू नायडू, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पवन कल्याण यांच्यासह अनेक दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. त्याव्यतिरिक्त अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने सामान्य लोकही उपस्थित होते. मात्र, आप नेते अरविंद केजरीवाल आणि आतिशी शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत.
मी शीशमहलमध्ये राहणार नाही : मुख्यमंत्री
रेखा गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप हायकमांडचे आभार मानले. मुख्यमंत्रिपद ही एक मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या हायकमांडचे आभार मानते. मी कधीच विचार केला नव्हता की मी दिल्लीची मुख्यमंत्री होईन. आता दिल्लीकरांच्या विकासासाठी आपण कार्यरत असल्याचे सांगतानाच सरकारी निवासस्थान असलेल्या ‘शीशमहल’मध्ये राहणार नसल्याचेही स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कोट्यावधींच्या उधळपट्टीमुळे दिल्लीत ‘शीशमहल’ चर्चेत आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी…
- सुषमा स्वराज यांच्यानंतर रेखा गुप्ता या भाजपच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री.
- भाजप व एनडीएशासित राज्यांमध्ये रेखा गुप्ता या एकमेव महिला मुख्यमंत्री.
- काँग्रेसच्या शीला दीक्षित या सर्वाधिक 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या.
- देशात प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर दिल्लीत रेखा गुप्ता या दोनच महिला मुख्यमंत्री.









